एक्स्प्लोर
मला तिकीट नाकारुन भाजपकडून विश्वासघात, सनीच्या उमेदवारीने विनोद खन्नांची पत्नी नाराज
'भाजपने विश्वासघात केल्याची भावना माझ्या मनात आहे. ज्या नागरिकांना मला खासदार म्हणून पाहायचं होतं, त्यांच्या इच्छांकडे दुर्लक्ष झालं आहे' असं कविता खन्ना यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : अभिनेता सनी देओलला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिवंगत माजी खासदार विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता खन्ना यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच सनी देओलला गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. कविता खन्ना यांनी विश्वासघात झाल्याची भावना बोलून दाखवली आहे.
कविता खन्ना यांनी गुरदासपूरमधून अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. 'भाजपने विश्वासघात केल्याची भावना माझ्या मनात आहे. ज्या नागरिकांना मला खासदार म्हणून पाहायचं होतं, त्यांच्या इच्छांकडे दुर्लक्ष झालं आहे' असं कविता खन्ना यांनी 'पीटीआय'ला सांगितलं.
'अपक्ष निवडणूक लढवण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, मात्र मी सर्व पर्याय चाचपडून पाहत आहे' असंही कविता म्हणाल्या.
'विनोद खन्नांसोबत आपणही गुरदासपूर मतदारसंघात 20 वर्ष काम केलं होतं. विनोदजींची प्रकृती बिघडल्यानंतर मी जनतेला भेटायचे. इथल्या मतदारांना मलाच खासदार म्हणून पाहायचं आहे' हे सांगतानाच भाजप आपल्याला तिकीट देईल, अशी अपेक्षा होती, असंही त्यांनी बोलून दाखवलं.
VIDEO | ढाई किलो का हाथ, भाजप के साथ, सनी देओलचा भाजपप्रवेश | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
गुरुदासपूर हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा पारंपरिक मतदारसंघ होता. 1997,1999, 2004 आणि 2014 मध्ये ते या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. 2017 मध्ये विनोद खन्नांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार सुनील जाखड हे तब्बल 1,93,219 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यामुळे काँग्रेसकडून ही सीट खेचून आणण्याचा भाजपचा मानस असेल.
निवडणूक लढवण्यासाठी सनी देओल स्वत: फारसा उत्सुक नव्हता. भाजप नेत्यांनी गळ घातल्यामुळे अखेर सनीने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
सनी देओल यांची सावत्र आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनीही मथुरेतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे विजेतेपदाची माळ दोघांच्याही गळ्यात पडली, तर चित्रपट विश्वातील मायलेक संसदेतही एकत्र झळकण्याची कदाचित ही पहिलीच वेळ ठरेल.
62 वर्षांचा सनी देओल 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून मुलगा करण देओलला लाँच करत आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुराही त्याच्याच खांद्यावर आहे. त्याची भूमिका असलेला 'मोहल्ला अस्सी' काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, त्यामुळे त्याचं प्रदर्शनही वारंवार लांबणीवर पडत होतं. भाईजी सुपरहिट, यमला पगला दिवाना, पोस्टर बॉईज, घायल वन्स अगेन हे त्याचे नजीकच्या काळातले चित्रपट.
सनीने 1983 साली बेताब चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर वर्दी, त्रिदेव, चालबाज, निगाहे यासारख्या चित्रपटातील त्याच्या अॅक्शन भूमिका अधिक गाजल्या. 1990 साली राजकुमार संतोषींच्या 'घायल' चित्रपटाने त्याला चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर दामिनी, डर, घातक, बॉर्डर, गदर एक प्रेमकथा यासारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement