Shivsena UBT: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंची मध्यस्थी; नाराज नेत्यांसह उमेदवारांना बोलावलं, रात्री मातोश्रीवर खलबतं
Shivsena UBT: मातोश्रीवर AB फॉर्म वाटप करताना वरळीतील नाराजी नाट्य निर्माण झालं होतं. वरळीतील नाराज उमेदवारांना समजवण्याचा उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले आहेत.

मुंबई: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. अनेक मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीची शक्यता वाढल्याने पक्षांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. अशातच शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी मतदार संघात बंडखोरी होऊ नये यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्याचं दिसून येत आहे. मातोश्रीवर AB फॉर्म वाटप करताना वरळीतील नाराजी नाट्य निर्माण झालं होतं. वरळीतील नाराज उमेदवारांना समजवण्याचा उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात नाराजीचा फटका बसणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
वरळी विधानसभेतील AB फॉर्म दिलेल्या उमेदवारांची आणि नाराज उमेदवारांची मध्यरात्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाग क्र. 193 मधून हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देणार असताना सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिल्याने मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं, त्याचबरोबर प्रभाग क्र. 196 मध्ये विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने महिला शाखाप्रमुख संगीता जगताप आणि युवासेना पदाधिकारी आकर्षिका पाटील नाराज झाल्या होत्या. प्रभाग क्र. 197 मनसेला दिल्याने अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवत थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. या सर्वांची मनधरणी करण्यासाठी मध्यरात्री मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं.सोबतच रात्री वरळीतील AB फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांना देखील मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं, त्यामुळे आता या रात्री पार पडलेल्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, नाराजीनाट्यावर कोणता तोडगा निघाला की, वरळी मतदार संघात नाराजीचा फटका बसणार असे अनेक तर्क वितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.
BJP: भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना झटका
आमदार आणि माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना मोठा झटका बसला आहे. विद्या ठाकूर यांचा मुलगा आणि विद्यमान नगरसेवक दीपक ठाकूर यांचा पत्ता कट झाला आहे. विद्यमान आमदार आणि खासदारांच्याच घरात तिकीट नको असा भाजपात निर्णय तिकीट नाही. वॉर्ड क्रमांक ५० मधून भाजप कार्यकर्ता विक्रम राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक ५० ओबीसी आरक्षित झाल्यामुळे दीपक ठाकूर यांना वॉर्ड कमांक ५५ मधून उमेदवारी हवी होती. मात्र वॉर्ड क्रमांक ५५ मधून विद्यमान नगरसेवक हर्ष भार्गव पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
BJP: गोरेगाव भाजपात बंडखोरी उफाळली
गोरेगावमध्ये भाजपात बंडखोरी उफाळली असल्याचं चित्र दिसून येत आहे. वॉर्ड क्रमांक ५४ मधील उमेदवारीवरुन भाजप कार्यकर्ते नाराज झाले असल्याचं चित्र आहे, गोरेगाव विधानसभा महामंत्री संदीप जाधव यांनी राजीनामा दिला आहे. संदीप जाधव बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून विप्लव अवसरेंना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये नाराजीनाट्य वाढले असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. मुलुंड विधानसभा महामंत्री प्रकाश मोटे यांचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.





















