Maharashtra Vidhan Sabha Election 2024: प्रचार संपताच 'लक्ष्मीदर्शनाला' सुरुवात; राजापुरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसेवाटप करताना पकडलं, राजन साळवींनी मध्यरात्री थेट पोलीस स्टेशन गाठलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीत पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून आता कोकणातील राजकारण तापले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीत पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून आता कोकणातील राजकारण तापले आहे. विरोधी उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर - लांजा-साखरपा या विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवे यांनी केला. यानंतर मध्यरात्री थेट राजन साळवी यांनी लांजा पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे अधिक माहिती अशी की, रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील एका ग्रामीण भागात गणेश लाखन नावाचे शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी एका घरामध्ये संशयास्पदरीत्या पैसे देत असल्याची बाब गावच्या पोलीस पाटलांच्या निदर्शनामध्ये आली. यानंतर सरपंच आणि पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार केली. शिवाय महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर साळवी यांनी थेट लांजा पोलीस स्टेशन गाठले.
सदर संपूर्ण प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 173, 351 ( 2 ) या अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय मोटार वाहन कायदा 60 / 177 हे कलम देखील आहे. गणेश लाखन, बाबू खामकर आणि ओंकार मोरे या तिघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, तसेच राजन साळवी यांनी चार दिवसांपूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पैशांचा वापर विरोधी पक्षाकडून होत असल्याचं पत्र देखील लिहिले आहे. गणेश लाखन हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. शिवसेना अर्थात महायुतीकडून किरण सामंत हे या ठिकाणी विधानसभेच्या रिंगणात आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप- अंबादास दानवेंचा आरोप
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली सदर प्रकरणावर ट्विट करत भाष्य केले आहे. छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. 'कर्तव्यदक्ष' जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे, असं अंबादास दानवे ट्विट करत म्हणाले.