नववधुला एक तोळं सोनं, विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट, तेलंगणात काँग्रेसच्या जाहीरनाम्यात एकापेक्षा एक मोठ्या घोषणा!
Telangana Election 2023: काँग्रेसनं जाहीरनाम्यात विवाहप्रसंगी नववधूला दहा ग्रॅम सोनं, एक लाख रुपये रोख रक्कम आणि विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट सेवा, अशा आश्वासनांची घोषणा केली आहे.
Telangana Assembly Election 2023: तेलंगणामध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचं (Telangana Election 2023) बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणात (Telangana Elections 2023) 30 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. याच निवडणुकांसाठी काँग्रेसनं सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसनं जाहीरनाम्यात विवाहप्रसंगी नववधूला दहा ग्रॅम सोनं, एक लाख रुपये रोख रक्कम आणि विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट सेवा, अशा आश्वासनांची घोषणा केली आहे. दरम्यान, काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची सध्या केवळ तेलंगणातच नाही तर संपूर्ण देशभरात चर्चा आहे.
नववधुला एक तोळं सोनं, विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट
तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीच्या जाहीरनामा सोमवारी (16 ऑक्टोबर) रोजी जाहीर करण्यात आला. तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष डी. श्रीधर बाबू यांनी जाहीरनाम्याबाबत बोलताना सांगितलं की, विवाहप्रसंगी एक लाख रुपयांच्या रोख निधीव्यतिरिक्त, पक्षाच्या 'महालक्ष्मी हमी'योजनेंतर्गत नववधूला सोनंही दिलं जाईल. पीटीआय वृत्त संस्थेशी बोलताना श्रीधर बाबूंनी सांगितलं की, नववधूंना एक तोळं सोनं दिलं जाईल, ज्याची किंमत प्रति तोळा 50 हजार ते 55 हजार रुपये असेल.
महत्त्वाची बाब म्हणजे, भारत राष्ट्र समितीचे (BRS) सरकारतर्फे सध्या 'कल्याण लक्ष्मी' आणि 'शादी मुबारक' योजना राबवल्या जात आहेत. याअंतर्गत, विवाहप्रसंगी 18 वर्ष पूर्ण केलेल्या आणि ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष दोन लाखांपेक्षा जास्त नाही, अशा महिलांना लग्नाच्या वेळी एक लाख 116 रुपये आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, काँग्रेसच्या या आश्वासनांवर टीका करताना बीआरएसचे प्रवक्ते श्रावण दासोजू म्हणाले की, ते काहीही आश्वासन देऊ शकतात. मात्र, त्यांनी कर्नाटकमध्ये निवडणुकीत दिलेली आश्वासनं त्यांना पूर्ण करता येत नाहीत.
सध्याच्या सरकारकडून नववधुंना दिलं जातंय अर्थसहाय्य
BRS सरकार, कल्याण लक्ष्मी आणि शादी मुबारक योजनेंतर्गत, तेलंगणातील रहिवासी नववधूंना लग्नाच्या वेळी 1,00,116 रुपये रोख आर्थिक सहाय्य प्रदान करतं. लग्नाच्या वेळी 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना ही रक्कम दिली जाते. ज्यांचं वार्षिक कुटुंब उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांनाच ही रक्कम दिली जाते.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस, बीआरएसमध्ये चुरस
राजकीय विश्लेषकांच्या मते तेलंगणामध्ये आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि बीआरएस यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. बीआरएस सध्या तेलंगणामध्ये सत्तेत आहे, तर काँग्रेसनं बीआरएसला पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसनं गेल्या काही दिवसांपासून तेलंगणामध्ये वर्किंग कमिटीच्या महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन केलं होतं. याव्यतिरिक्त इथे बीआरएस आणि काँग्रेस यांच्यात पोस्टर वॉरही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :