Sujay Vikhe vs Balasaheb Thorat : संगमनेरमध्ये विखे-थोरात वादाचा भडका, जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संघर्ष पेटला; गाड्यांची तोडफोड
Sujay Vikhe vs Balasaheb Thorat : संगमनेरमध्ये विखे आणि थोरात घराण्यातील वाद शिगेला पोहोचलाय. जयश्री थोरात यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.
Sujay Vikhe vs Balasaheb Thorat, संगमनेर : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव सुजय विखेंच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. सुजय विखेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शड्डू ठोकलाय. त्यांनी थोरात यांच्याविरोधात प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, सुजय विखेंनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांचा उल्लेख राजकन्या असा केला होता. त्यानंतर जयश्री थोरात यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. "कोणाची टिंगल करत आहात. मी थोरात साहेबांची मुलगी आहे. संयम राखू शकते. पण लक्षात ठेवा, मी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांची नात सुद्धा आहे. चांगली खनकावू पण शकते", असं जयश्री थोरात म्हणाल्या होत्या.
बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
दरम्याना, आता सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे. जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात आज (दि.25) सुजय विखे यांची सभा झाली. सभेदरम्यान वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुजय विखे मंचावर उपस्थित असताना जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. टीका करणारे वसंतराव देशमुख धांदरफळ गावातील रहिवासी आहेत. त्यानंतर देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सभास्थळी ठिय्या मांडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय.
सुजय विखे सभेत काय काय म्हणाले?
सुजय विखे म्हणाले, संगमनेर तालुक्यात आल्यावर माझ्यात काहीतरी दैवीशक्ती येते. मला संगमनेरच्या नेतृत्वाचा प्रॉब्लेम कळत नाही. मी प्रश्न विचारतो एक, ते उत्तर देतात वेगळंच. 40 वर्षात यांचं भाषण बदलले नाही. आता तरी भाषण बदला. आम्ही इथे अन्नात मातीत कालवायला आलो नाही. यावेळी टांगा पलटी होणार आहे. तुम्ही काल माझ्या भूमीत येऊन आरोप केले. मला तुमच्या भूमीत येऊन उत्तर द्यावच लागेल. ते म्हणतात हा मेंदूचा ओरिजनल डॉक्टर नाही. हा डॉक्टर कसा आहे हे जे बरे झाले त्यांना जाऊन विचारा हा डॉक्टर कसा आहे. मी डोक्यावर पडलो म्हणतात. मी घरी जाऊन आई बाबाला विचारले. मी खरंच डोक्यावर पडलो होतो का? ही गर्दी पाहून त्यांचं डोकं बंद पडलंय. तुम्ही लोकांना धमकावू शकता. मात्र आता ज्यांना विचारत नव्हते, त्यांच्या पाया पडण्याची वेळ यांच्यावर आली. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. अमृत वाहिनी बँकेचा चेअरमन घोटाळ्यात कसा गेला? असा सवालही सुजय विखे यांनी केला.
इतर महत्त्त्वाच्या बातम्या