Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांच्या संपत्तीत वर्षभरात तिप्पटीने वाढ; पावणेदोन कोटींचे झाले साडेसहा कोटी
Sudhakar Badgujar: 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पावणेदोन कोटींचे धनी असलेले बडगुजर साडेसहा कोटी रुपयांचे मालक झाल्याचे त्यांच्या महापालिका निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.

Sudhakar Badgujar: शिवसेना (ठाकरे गट) मधून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळात (Nashik Politics) चर्चेचा विषय ठरले आहेत. पक्षांतरासोबतच त्यांच्या संपत्तीत झालेली लक्षणीय वाढ सर्वांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या पावणेदोन कोटींचे धनी असलेले बडगुजर आता साडेसहा कोटी रुपयांचे मालक झाल्याचे त्यांच्या महापालिका निवडणूक (Nashik Municipal Election 2026) अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. अवघ्या एका वर्षात त्यांची मालमत्ता तिपटीने वाढल्याची बाब उघड झाली आहे.
सध्या सुधाकर बडगुजर हे प्रभाग क्रमांक 25 अ मधून भाजपच्या तिकीटावर महापालिका निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील तपशीलामुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटात असतानाही आणि आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही बडगुजर हे कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.
Sudhakar Badgujar: ठेकेदार ते राजकीय नेते
सुधाकर बडगुजर यांचा राजकीय प्रवास विलक्षण राहिला आहे. महापालिकेत ठेकेदार म्हणून कारकीर्द सुरू करणारे बडगुजर पुढे शिवसेनेत सक्रिय झाले. खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. या संबंधांमुळे पक्षात तसेच महापालिकेत त्यांना अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली.
Sudhakar Badgujar: सलीम कुत्ता प्रकरणामुळे अडचणी
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप शिंदे गट व भाजप नेत्यांनी चित्रफितीद्वारे उघड केल्यानंतर बडगुजर अडचणीत आले होते. या प्रकरणामुळे त्यांच्यामागे एसआयटी चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यानंतर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
Sudhakar Badgujar: पराभवानंतर भाजप प्रवेश
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्तरावर तीव्र विरोध असतानाही भाजपने त्यांना स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. स्थानिकांचा तीव्र विरोध डावलून भाजपने त्यांना पक्षात प्रवेश दिल्याने हा विषय राजकारणात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता.
Sudhakar Badgujar: एबी फॉर्म आणि घरातील तीन तिकीटांचा वाद
महापालिका निवडणुकीत पक्षाच्या धोरणानुसार आमदारांच्या मुलांना उमेदवारीतून माघार घ्यावी लागली. मात्र, या नियमालाही बडगुजर अपवाद ठरले. त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना उमेदवारी मिळाल्याने मोठा वाद निर्माण झाला. एबी फॉर्मच्या गोंधळामुळे सिडको विभागात भाजपची नामुष्की झाल्यानंतर अखेर बडगुजर कुटुंबातील एक एबी अर्ज मागे घेण्यात आला.
Sudhakar Badgujar: प्रतिज्ञापत्रातून संपत्तीचा तपशील उघड
प्रभाग 25 अ मधून निवडणूक लढवणारे सुधाकर बडगुजर हे शेती व व्यापार व्यवसाय करतात. त्यांच्यावर विविध कलमांखाली सहा गुन्हे दाखल असून सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. बडगुजर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 14 लाख 44 हजार रुपयांहून अधिक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, बडगुजर दाम्पत्याकडे नाशिक व जळगाव येथे स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन असून तब्बल 515 ग्रॅम सोनं (सुमारे 65 लाख रुपये मूल्य) असल्याची नोंद आहे. कुटुंबाकडे 2 कोटी 42 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि 4 कोटी 11 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असून एकूण संपत्ती 6 कोटी 54 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या कोट्यवधी संपत्तीसोबत त्यांच्यावर कोणतेही कर्ज अथवा दायित्व नसल्याचेही नमूद आहे.
Sudhakar Badgujar: वर्षभरात तिप्पट वाढ
महत्त्वाची बाब म्हणजे, 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटात असताना बडगुजर यांची स्थावर व जंगम मालमत्तेची एकूण किंमत 1 कोटी 79 लाख 19 हजार 228 रुपये इतकी होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या वर्षभरात ही संपत्ती तिपटीने वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांचा राजकीय प्रवास, पक्षांतर आणि झपाट्याने वाढलेली संपत्ती नाशिकच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा




















