Thackeray Rally : ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत भाषणाचा पहिला मान संदीप देशपांडेंना, ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो म्हणत जोरदार फटकेबाजी
Sandeep Deshpande : उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची संयुक्त सभा शिवाजी पार्कवर सुरु आहे. या सभेत भाषणाचा पहिला मान संदीप देशपांडेंना देण्यात आला.

मुंबई : उद्धव ठाकरेंची शिवेसना, राज ठाकरेंची मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची संयुक्त सभा शिवाजी पार्कवर सुरु आहे. या सभेत पहिला मान मनसेच्या संदीप देशपांडेंना देण्यात आला. मला तर कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं कधी होईल. ठाकरे बंधूंची सभा असताना मला भाषण करायला मिळेल हे स्वप्नातही नव्हतं. मी भाषण करतोय हे माझं भाग्य समजतो. अनेक दिवसांपासून लोकं म्हणतात ठाकरे ब्रँड संपला, मला हे सांगायचं आहे, ठाकरे हा ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार कधी संपत नसतो, तुमचा गुजरातचा आहे तो ब्रँड आहे, आमचा विचार आहे. कोलगेट वापरुन झाल्यानंतर लोक पेप्सोडेंट वापरतात. 10 वर्ष तुम्हाला वापरुन कंटाळा आलाय, तुम्हाला लोक चेंज करणार आहेत. हा बदल करण्यासाठी आमचा विचार उपयोगी ठरणार आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले.
आमच्या इथं रणरागिनी बसल्या आहेत, त्यांना आमिष दाखवली जातात. आमच्या बहिणी होत्या, त्या लाडक्या बहिणी झाल्या आहेत.1500 रुपयांचं आमिष दाखवायचं, तुम्ही आम्हाला मतदान करा. आता 13 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकणार आहेत, असं म्हटलं जातंय. निवडणुकीची आचारसंहिता आमच्यासाठी असते, त्यांच्यासाठी नाही, अशी टीका देशपांडे यांनी केली. नवऱ्याचा अख्खा पगार खिशात घालून सुद्धा त्या नवऱ्याला बधत नाहीत त्या तुमच्या 1500 रुपयाला बधणार आहेत का? असा सवाल देशपांडे यांनी केला.
ठाकरे काय मराठीसाठी आले नाही, सत्तेसाठी एकत्र आले असं शिंदे शिवसेना वाले म्हणतात. भाजप, शिंदे शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी काँग्रेस गोट्या खेळायला एकत्र आले आहेत की विटी दांडू खेळायला आले आहेत, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.
आपण सगळे मराठी आहोत. आम्हाला 56 इंचांची छाती आहे, ती फुगवून आम्ही सांगू शकतो मराठी आहोत. तुमच्या कुरेशींना सांगायला जमणार आहे का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. ही निवडणूक खरंतर वेगळी निवडणूक आहे. महापालिका निवडणूक असते त्यावेळी अनेक विषयांवर, अनेक मुद्यांवर चर्चा करत असतो. आरोग्याची चर्चा असते, प्राथमिक शिक्षणाची चर्चा असते. या सगळ्या प्रश्नांसोबत निवडणूक मराठी माणसासाठी महत्त्वाची आहे, मराठी अस्मितेसाठी महत्त्वाची आहे. आपण काय खायचं हे आम्हीच ठरवणार हे ठासून सांगण्यासाठी महापालिकेची निवडणूक आहे. या मुंबई महापालिका निवडणूक मराठीच महापौर बसणार हे सांगण्यासाठी ही सभा आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
न्यूयॉर्कला ममदानी मुस्लीम म्हणून निवडून आले नाहीत, तिथं येणाऱ्या परप्रांतियांनी तिथली डेमॉग्राफी बदलली त्यामुळं ते विजयी झाले, असं संदीप देशपांडेंनी म्हटलं. मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता आल्यानंतर दीड लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या जाव्यात. याशिवाय बेस्टचं बीएमसीत विलिनीकरण करावं, असंही देशपांडे म्हणाले.





















