(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कन्नडमध्ये नवरा विरुद्ध बायको, मुंबादेवीतून भाजपच्या शायना एन सी तर बार्शीतून राजेंद्र राऊत यांना तिकीट, एकनाथ शिंदेंची तिसरी यादी जाहीर
Shivsena Candidate List : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 15 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये संजना जाधव, शायना एनसी, राजेंद्र राऊत यांचा समावेश आहे.
मुंबई : शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी 15 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या तिसऱ्या यादीमध्ये संजना जाधव, शायना एनसी, राजेंद्र राऊत यांची नाव अधोरेखित करण्यासारखी आहेत. यातील दोघांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात थोरात आणि विखे पाटील यांच्यात वादाचा अंक पाहायला मिळाला. मात्र, ती जागा देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली आहे. नगरमधील श्रीरामपूरची जागा देखील सेनेकडे गेली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या यादीची वैशिष्ट्ये :
संजना जाधव अन् हर्षवर्धन जाधव आमने सामने
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते माजी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उदयसिंह राजपूत विद्यमान आमदार आहेत. ते देखील रिंगणात आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळं या मतदारसंघात पती पत्नी आमने सामने येताना पाहायला मिळणार आहेत.
राजेंद्र राऊत यांना उमेदवारी
बार्शी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेनं अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजेंद्र राऊत यांनी कालच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.बार्शीत आता ठाकरेंच्या शिवसेनेचे दिलीप सोपल विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे राजेंद्र राऊत यांच्यात लढत होईल.
मुंबादेवीत भाजपच्या शायना एनसी यांना उमेदवारी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या यादीमधील आणखी एक आश्चर्यकारक नाव म्हणचे भाजपच्या शायना एनसी होय. शायना एनसी या वरळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. त्यांना मुंबादेवी तून उमेदवारी देण्यात आली आहे. शायना एनसी यांची लढत काँग्रेसच्या अमिन पटेल यांच्या विरोधात होईल.
संगमनेर अन् श्रीरामपूर देखील शिंदेंच्या शिवसेनेकडे
अहिल्यानगरमधील संगमनेर या मतदारसंघात थोरात आणि विखे यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सुजय विखे संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या. मात्र, या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उमेदवार जाहीर केला आहे.संगमनेर मधून अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, श्रीरामपूर मधून मल्हारी कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, करमाळा विधानसभा मतदारसंघात देखील शिवसेनेकडून बागल कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आली आहे.
इतर बातम्या :