Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तनाचं भाकीत. महाराष्ट्रातील जनतेला शरद पवारांची सत्तापरिवर्तनाची साद
बारामती: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातील जनता प्रचंड मताधिक्याने युगेंद्र पवार यांना विजयी करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह समस्त पवार कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी साधताना विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्यावतीने जनतेला साद घालताना महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करण्याचे आवाहन केले.
कालच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने आम्हा सगळ्यांना म्हणजे मविआला प्रचंड प्रतिसाद दिला. जवळपास 48 पैकी 31 लोकसभा मतदारसंघांमध्ये मविआला यश मिळाले. त्याबद्दल मी जनतेला आभारी आहे. मी त्यांना विश्वास देतो की, तुम्ही लोकसभेत जी कामगिरी केली आहे, त्याची नोंद आम्ही अंत:करणात ठेवलेय. आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. मविआच्यावतीने आम्ही विधानसभेच्या सगळ्या जागा लढवतोय. तिन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करत आहोत. 95 टक्के जागांवर आमचं एकमत झाले आहे. काही मर्यादित जागांबाबत आमच्यात विचारविनिमय सुरु आहे, त्याबाबत येत्या एक-दोन दिवसांत स्पष्टता येईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील जनतेला शरद पवारांची सत्तापरिवर्तनाची साद
शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्यावतीने राज्यातील जनतेला सत्तापरिवर्तन करण्याचे आवाहन केले. आम्हाला महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचे आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत. आज ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडून हे प्रश्न सोडवले गेले नाहीत. अलीकडच्या काळात पक्षफुटी, पक्षांची मोडतोड करणे, सत्तेसाठी नको ती तडजोड करणे, विचार आणि कार्यक्रमाशी तडजोड करणे, हे ज्या घटकांनी महाराष्ट्रात केलंय, त्यांच्याविषयी आम्ही जनतेसमोर जाऊन भूमिका मांडणार आहोत. जनतेला परिवर्तनासाठी तयार करण्याची आमची भूमिका आहे. मी मविआच्यावतीने महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास देतो की, महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करणारा, शेतकरी, महागाई, बेरोजगारी, कामगारांचे प्रश्न, दलित, आदिवासी, महिला यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमची आघाडी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, असे शरद पवार यांनी सांगितले.
मविआच्या एकजूटीविषयी तयार झालेले संशयाचे ढग पवारांनी दूर केले
गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावरुन मविआतील तिन्ही पक्षांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे मविआच्या एकतेला तडा जाईल की काय, असे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, शरद पवार यांनी जागावाटपावरुन सुरु असलेल्या वादाबाबत सुस्पष्ट आणि सविस्तर भूमिका मांडत मविआच्या एकजुटीविषयी असलेले संशयाचे धुके दूर केले. त्यांनी म्हटले की, मविआची जागावाटपाची प्रक्रिया सुरु आहे. काही जागांवर मविआतील दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. या जागांबाबत निर्णय न झाल्याने आम्ही दोन्ही पक्षांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले आहे. कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अद्याप अवकाश आहे. आघाडीत अशाप्रकारे चर्चा करण्यासाठी आवश्यकता असते. मविआत बहुसंख्य जागेसंबंधी एकमत झाले आहे. थोड्या जागांचा प्रश्न आहे. त्यामधून आम्ही निश्चित मार्ग काढू, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा