Rohit Patil on Sharad Pawar : अजितदादांनी आर आर पाटलांवर आरोप केल्यानंतर शरद पवारांनी रोहित पाटलांना कोणता सल्ला दिला?
Rohit Patil on Sharad Pawar : अजित पवार यांनी आर आर पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर शरद पवारांनी कोणता सल्ला दिला? याबाबत रोहित पाटील यांनी भाष्य केलं आहे.
Rohit Patil on Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर आर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर आर आबांनी केसाने गळा कापला, असंही अजित पवार म्हणाले होते. दरम्यान, अजित पवारांनी आरोप केल्यानंतर आमच्या कुटुंबाला दु:ख झालं, असं रोहित पाटील यांनी म्हटलं होतं. आता अजित पवार यांनी आर आर पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर शरद पवारांनी कोणता सल्ला दिला? याबाबत रोहित पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
रोहित पाटील म्हणाले , आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि त्यापूर्वी 2014 पासून अजित पवार यांच्या नेतृत्वात जोमाने काम केलेलं आहे. त्यांनी तासगाव-कवठे महाकाळ मतदारसंघात अनेक दौरे केलेले आहेत. असं असताना आबा जाऊन इतके वर्ष झाल्यानंतर असं स्टेटमेंट किंवा मनात असलेली मळमळ बाहेर आल्यामुळे आम्हाला दु:ख झालं. आमच्या सर्व कुटुंबियांना याचं दु:ख झालं. आज सकाळीच माझी आजी मला म्हणाली, त्यांनी तसं नाही करायला पाहिजे होतं. आबा हयात असते तर प्रश्न वेगळा होता. इतकी वर्ष मनमन साठवून ठेऊन बोलणे, हे आमच्या लोकांना रुचलेलं नाही.
पुढे बोलताना रोहित पाटील म्हणाले, आबा सिंचन घोटाळ्याबाबत म्हणायचे की ज्या खात्यामध्ये इतका खर्च झालेला नाही. त्यामध्ये इतका खर्च कसा होऊ शकतो? हे प्रसार माध्यमांसमोर आबांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या त्या स्टेटमेंटच्या जुन्या क्लिपही उपलब्ध असतील. आबांनी ठरवलं म्हणून चौकशी लागली असं कोणतीही बाब नव्हती. आबांनी गृहमंत्री असताना स्वच्छ कारभार केला, अनेक निर्णय घेतले.
शरद पवारांनी रोहित पाटलांना कोणता सल्ला दिला?
अजित पवारांनी आरोप केल्यानंतर शरद पवारांनी रोहित पाटलांना महत्त्वाचा सल्ला दिला. रोहित पाटील म्हणाले, अजित पवारांनी आरोप केल्यानंतर माझं सुप्रिया ताईंशी बोलणं झालं. पवार साहेबांशी बोलणं झालं. रोहित पवार यांच्याशी बोलणं झालं. पवार साहेब मला म्हणाले, याबाबत मी बोलतो. तुम्ही काही बोलू नका. सुप्रियाताईंनी आम्हाला सर्वांना धीर देण्याच प्रयत्न केला.
मी अजित पवार यांच्याकडे एखादे काम घेऊन गेलो की, पक्ष प्रवेश करा, अन्यथा निधी देणार नाही, असं सांगितलं जात होतं. मी जर अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांनी आबांबाबतचं वक्तव्य केलं नसतं. आबा प्रदिर्घ काळ गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. त्यांनी द्वेष भावना वापरुन कधीही विरोधकांवर सत्तेचा वापर केला नाही, असंही रोहित पाटील म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या