(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratnakar Gutte : जानकरांचा निर्णय काहीही असो, मी महायुतीसोबतच; रासपच्या एकमेव आमदाराची जाहीर भूमिका
Ratnakar Gutte : रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जर वेगळी भूमिका घेतली तर त्याच्याशी आपण सहमत नाही असं त्यांच्या पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले.
परभणी : महादेव जानकर काहीही भूमिका घेऊदेत, मी मात्र महायुतीसोबतच असल्याचं रासपचे एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे यांनी स्पष्ट केलं. महायुतीने मला पुरस्कृत केलंय, त्यामुळे महादेव जानकर यांनी जर वेगळी भूमिका घेतली तर मी त्याच्याशी सहमत नाही असंही ते म्हणाले. रत्नाकर गुट्टे हे परभणीतील गंगाखेडचे नवनियुक्त आमदार आहेत. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचेही ते एकमेव आमदार आहेत.
रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही भूमिका जाहीर केली. त्यामुळे रासपचा एकमेव आमदारही महायुतीच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी रासपच्या महादेव जानकरांनी वेगळी भूमिका घेतली होती. या निवडणुकीत छोटे पक्ष किंगमेकर ठरणार असून जे कुणी सत्तेत येतील त्यांच्यासोबत राहणार असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांनी म्हटलं होतं. पण राज्यातील जनतेने महायुती सरकारला स्पष्ट बहुमत दिल्याचं दिसून आलं.
गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टेंची बाजी
राज्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना-ठाकरे गटाचे उमेदवार विशाल कदम यांचा 23 हजार 292 मतांनी पराभव केला आहे. हा सामना खूपच रोचक होता. रत्नाकर गुट्टे यांना 1 लाख 41 हजार 544 मते मिळाली. तर विशाल कदम यांना 1 लाख 15 हजार 252 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे सीताराम घनदाट 43 हजार 26 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघ परभणी जिल्ह्यात येतो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुट्टे यांना 81,169 मते मिळाली होती. तर शिवसेनेचे विशाल कदम यांना 63,111 मते मिळाली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे या जागेवरून आमदार झाले होते.
ही बातमी वाचा: