Rajya Sabha Election 2026: शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार राज्यसभेतून निवृत्त होणार; 2026 मध्ये मोठे राजकीय बदल, कोणत्या दिग्गजांचा समावेश?
Rajya Sabha Election 2026: शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 2026 मध्ये पूर्ण होत असून ते निवृत्त होणार आहेत.

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या राजकारणात येत्या काळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत असून ते निवृत्त होणार आहेत. देशभरात भाजपचे सर्वाधिक 30 खासदार यंदा राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.
2026 हे वर्ष राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार असून, या वर्षात देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यसभेतील सदस्यांची निवृत्ती आणि नव्या निवडणुकांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यंदा राज्यसभेतील एकूण 71 खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापैकी मार्च महिन्यात 1, एप्रिलमध्ये 37, जूनमध्ये 22 तर नोव्हेंबरमध्ये 11 खासदार निवृत्त होणार आहेत.
Rajya Sabha Election 2026: 73 राज्यसभा जागांसाठी निवडणूक
राज्यसभेच्या एकूण 245 जागांपैकी एप्रिल, जून आणि नोव्हेंबर 2026 या कालावधीत 73 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यातील सर्वात मोठे नाव म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे. त्यांचा कार्यकाळ 25 जून 2026 रोजी संपणार आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही त्याच कालावधीत राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.
Rajya Sabha Election 2026: महाराष्ट्रातून कोण निवृत्त होणार?
महाराष्ट्रातील एकूण सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सर्वात मोठे नाव आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार धैर्यशील मोहन पाटील यांचाही समावेश आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार डॉ. फौजिया खान हे सर्वजण एकाच दिवशी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.
Rajya Sabha Election 2026: उत्तर प्रदेशातून 'हे' नेते होणार निवृत्ती
दरम्यान, उत्तर प्रदेशातूनही काही महत्त्वाची नावे निवृत्त होत आहेत. मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि बी. एल. वर्मा यांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर 2026 रोजी संपणार आहे. याच वेळी उत्तर प्रदेशातील आणखी आठ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळही पूर्ण होणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांचाही कार्यकाळ पुढील वर्षी समाप्त होत आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचाही निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये समावेश आहे.
Rajya Sabha Election 2026: संसदेत कोणते नवे चेहरे प्रवेश करणार?
याशिवाय झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शक्तीसिंह गोहिल, तेलंगणातील काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले, लोकसभेचे माजी उपसभापती थंबी दुराई आणि द्रमुक नेते तिरुची शिवा हेही राज्यसभेच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. राष्ट्रपती नामनिर्देशित कोट्यातून राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेले माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाळ मार्च 2026 मध्ये संपणार आहे. या पार्श्वभूमीवर संसदेत कोणते नवे चेहरे प्रवेश करणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा




















