राजस्थानमधील निकालाची प्रथा कायम, भाजपने विजयाचा झेंडा फडकावत काँग्रेसचा केला पराभव; पाहा संपूर्ण आकडेवारी
Rajasthan Election Final Result : भाजप 115 जागांववर विजय मिळवत असून, काँग्रेसला 70 जागांवर समाधान मानावे लागत आहे. तर, इतर 14 ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली आहे.
Rajasthan Election Final Result : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून, राजस्थानमधील निकालाची प्रथा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, अपेक्षेप्रमाणे भाजपने (BJP) विजयाचा झेंडा फडकावत काँग्रेसचा (Congress) पराभव केला आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्ता बदलण्याची राजस्थानची प्रथा असून, यंदाही ती कायम राहिली आहे. दरम्यान, राजस्थानमधील निकालाची आकडेवारी पाहिली असता, भाजप 115 जागांववर विजय मिळवत असून, काँग्रेसला 70 जागांवर समाधान मानावे लागत आहे. तर, इतर 14 ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली आहे.
मतमोजणीला सुरवात झाल्यापासूनच भाजपने राजस्थानमध्ये आघाडी घेतली होती. पाहता-पाहता भाजपने बहुमताचा 100 जागांचा आकडा पार केला. दरम्यान, पुढे काही तासांनी आकडे बदलले आणि भाजपच्या जागेत आणखी वाढ झाली. त्यामुळे, राजस्थानमध्ये भाजपचीच सत्ता येणार असल्याचे जवळपास आता स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही. अनेक नावं चर्चेत असून, अंतिम निर्णय दिल्लीत घेतला जाणार आहे.
पक्षीय बलाबल (2023)
भाजप : 115
काँग्रेस : 70
इतर : 14
पक्षीय बलाबल (2018)
काँग्रेस : 100
भाजप : 73
इतर : 27
मुख्यमंत्री कोण होणार?
राजस्थान विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास भाजपची सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. परंतु, भाजपने राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा पुढे न करता ही निवडणूक लढवली होती. वसुंधरा राजे 2003 पासून राजस्थानमध्ये भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे. मात्र, यावेळी पक्षाने त्यांचा चेहरा पुढे करण्यास टाळले होते. त्यामुळे या निवडणुकीत अनेक चेहऱ्यांची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यात, वसुंधरा राजे आणि महंत बालकनाथ योगी यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. सोबतच, दिया कुमारी, राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी, गजेंद्र सिंह शेखावत, भूपेंद्र चौधरी, र्जुनराम मेघवाल, अश्विनी वैष्णव किंवा सुनील बन्सल यांच्या देखील नावाची चर्चा आहे.
12 मंत्र्यांचा पराभव
राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या गहलोत मंत्रिमंडळातील 12 बलाढ्य नेत्यांचा पराभव झाला आहे. गहलोत यांच्या 12 मंत्र्यांना पराभव स्वीकारावा लागला असल्याने काँग्रेससाठी ही विचार करायला लावणारी गोष्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: