Raj Thackeray : मुंबई गुजरातला जोडण्याचं काम सुरू, मुंबईत मराठी टक्का मोठा, मतदानासाठी त्यांनी बाहेर पडावं; राज ठाकरेंचा वादळी 'कट्टा'
Raj Thackeray Majha Katta : मुंबई विमानतळाचं महत्व कमी करून ती जागा उद्योगपतीच्या घशात घालण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

मुंबई : मुंबईत मराठी माणसाचा टक्का हा कमी नाही, मराठी माणसाची संख्या मोठी आहे. पण मराठी माणसाचा टक्का कमी असल्याची अफवा उठवायची आणि त्याचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. मुंबई थेट तोडता येत नाही, पण ती गुजरातला जोडण्यासाठी पद्धतशीरपणे आखणी केली जात आहे, मुंबई ते सुरत तसा मार्ग विकसित केला जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. राज ठाकरेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा वादळी कट्टा एबीपी माझावर शुक्रवारी सकाळी 9 वाजता एबीपी माझावर पाहता येणार आहे.
मुंबईत मराठी माणसांची लोकसंख्या ही कमी नाही, पण मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी झाल्याची अफवा उठवण्याचं काम भाजपकडून सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्या माध्यमातून मतदारांवर नकारात्मक परिणाम आणि मराठी माणसाचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे आता मतदारांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडावं आणि मतदान करावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
Raj Thackeray BMC Election : मुंबई गुजरातला जोडण्याचा प्लॅन तयार
मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, मुंबई ही गुजरातला मिळाली नाही ही काही लोकांची जखम अजूनही भळभळते असा आरोप अनेकदा राज ठाकरे यांनी केला आहे. आताही तोच आरोप करत राज ठाकरे म्हणाले की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि गुजरातला जोडण्याचा पद्धतशीरपणे डाव आखण्यात आला आहे. त्यासाठी नवी मुंबई, पालघर-वाढवण बंदर आणि पुढे गुजरात असा पट्टा एकमेकांना जोडला जात आहे. बुलेट ट्रेनचा मार्गही तशाच पद्धतीने आखण्यात आला आहे. या सगळ्या माध्यमातून मुंबई गुजरातला हळूहळू जोडली जात आहे.
यामागील आणखी एक गोष्ट म्हणजे मुंबई विमानतळाचं महत्त्व संपूर्णपणे कमी करण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखला असल्याचा आरोप यावेळी राज ठाकरे यांनी केला. नवी मुंबई विमानतळाच्या माध्यमातून या गोष्टी केल्या जात आहेत. येत्या काळात मुंबई विमानतळ गायब करून ती जागा उद्योगपतीच्या घशात घालायची असा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
Raj Thackeray Mumbai Election : प्रशासकांमार्फत चुकीच्या गोष्टी
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपूण तीन-चार वर्षे उलटली, मधल्या काळात प्रशासकांकडून कामं करुन घेण्यासाठी निवडणुका न घेता त्या पुढे ढकलण्यात आल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, "मुंबई महापालिकेचा कार्यकाळ हा 2022 मध्ये संपला. या मधल्या काळात काय केलं? महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि दुसरे पक्ष जर सत्तेत आले तर त्याचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी मधल्या काळात, विशेषतः 2024-25 मध्ये प्रशासकाकडून काही गोष्टी करुन घेतल्या. त्यासाठी या निवडणुकांना उशीर करण्यात आला."
Raj Thackeray On BJP : एवढा माज कुठून येतो?
भाजपकडून जर मुंबईचा विकास केल्याचा दावा केला जात असला तर पैसे वाटायची वेळ का येते असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला. काही मुठभर लोकांवरुन पूर्ण समाजाचं चित्रण मांडू शकत नाही. प्रत्येक मतदार हा विकला जात नाही. त्याचा एक विचार आहे, त्याचंही एक मत आहे असं राज ठाकरे म्हणाले.
निवडणुकीत काहीही होऊ शकतं हे माहिती असल्यामुळे या आधीचे सत्ताधारी निवडणुकीमध्ये नम्र असायचे. पण आता तसं दिसत नाही. काहीही झालं तरी आपणच निवडून येणार हे त्यांना ठाम माहिती असतं. त्यामुळेच त्यांचे सगळे उलटे धंदे सुरू असतात. मग यांचा हा माज येतो कुठून? असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला.
ही बातमी वाचा:




















