(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे राज ठाकरेंचे 3 प्रमुख उमेदवार पराभूत; धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला एकतर्फी बहुमत दिलं आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा सुफडासाफ झाला. राज्यात महाविकास आघाडी केवळ 49 जागा मिळाल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचितला एकही जागा जिंकता आली आहे. तर मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या मनसेच्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीच्या 8, तर महायुतीच्या 4 उमेदवारांना पराभवाच्या सामना करावा लागला. तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे मनसेला तीन जागांवर मोठा फटका बसल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे. माहीम विधानसभा, वरळी विधानसभा आणि कल्याण ग्रामीण विधानसभेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे मनसेला मोठा फटका बसला.
शिवसेना शिंदे गटामुळे मनसेचे तीन उमेदवार पराभूत-
माहीममध्ये ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला. माहीम विधानसभेत महेश सावंत, सदा सरवणकर आणि अमित ठाकरे अशी तिरंगी लढत झाली. महेश सावंत यांना 50,213 मते मिळाली. तर सदा सरवणकर यांना 48,897, अमित ठाकरेंना 32,710 मते मिळाली. त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे राजू पाटील विद्यामान आमदार होते. परंतु 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राजू पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. मनसेचा एकमेव आमदार असलेले राजू पाटील देखील पराभूत झाले. कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांनी बाजी मारली. राजेश मोरे यांना 1,41,164 मते मिळाली. तर ठाकरे गटाते सुभाष भोईर यांना 70, 062 मते मिळाली. मनसेचे राजू पाटील यांना 74,768 मतांवर समाधान मानावे लागले. वरळी विधानसभा मतदारसंघात देखील तिरंगी लढत झाली. या लढतीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवला. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा दुसऱ्या स्थानावर राहिले. मनसेचे संदीप देशपांडे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आदित्य ठाकरेंना एकूण 62,324 मते मिळाली. मिलिंद देवरा यांना 54,523, तर संदीप देशपांडे यांना 19,367 मते मिळाली.