(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Bypoll Election : पोटनिवडणुकीच्या प्रचार आज थांबणार, शेवटचा दिवस रोड शोने गाजणार!
Pune Bypoll Election : कसबा आणि चिंचवड त्याआधी रोड शो करुन, सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय नेते करणार आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजच शेवटचा दिवस आहे.
Pune Bypoll Election : कसबा (Kasba Bypoll Election) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll Election) विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा (Election Campaign) आजच (24 फेब्रुवारी) शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबणार आहे. त्याआधी रोड शो करुन, सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय नेते करणार आहेत.
पुण्यात आज पॉलिटिकल फ्रायडे, कोणाकोणाचे रोड शो?
* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी दुपारी एक वाजता महात्मा फुले वाड्यापासून रोड शो करणार आहेत.
* तर कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सकाळी अकरा वाजता रोड शो करणार आहेत.
* चिंचवड मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अश्विन जगताप यांच्यासाठी बैठका आणि प्रचार रॅली करणार आहेत
* नाना काटे यांच्यासाठी अजित पवार चिंचवडमधे रोड शो करणार आहेत.
शिंदे फडणवीसांची कसब्यातील कालची सभा अचानक रद्द
दरम्यान कसबा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची कालची सभा अचानक रद्द झाली आहे. कसबा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी काल डेक्कनच्या नदीपात्रात संध्याकाळी पाच वाजता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा ऐनवेळी भाजपकडून रद्द करण्यात आली आहे. त्या ऐवजी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा रोड शो होणार आहे. जाहीर सभा घेण्यापेक्षा रोड शोच्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत पोहचता येईल. त्यामुळे सभा रद्द केल्याचं माजी महापौर मुरलीधर मोहोळांनी सांगितलं आहे. मात्र प्रचार जोरात सुरु असताना ऐनवेळी सभा रद्द केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
भाजप आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी
पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. कसबा आणि चिंचवड निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष ताकदीनिशी प्रचार सभा, बाईक रॅली आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे. कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरु आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यासाठी भाजप तसंच महाविकास आघाडी जोर लावत आहेत. शिवाय इथे बंडखोर राहुल कलाटे यांचाही जोरदार प्रचार सुरु आहे.
पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान, 2 मार्चला निकाल
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. तर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी येत्या 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल.