प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या, गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसला मदत करणार प्रशांत किशोर?
भाजपसोबत 2014 साली काम केलेले निवडणूक रणनीतीकार आता राजकारणाचं दुसरं टोक गाठत काँग्रेससोबत दिसणार का? या प्रश्नाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
नवी दिल्ली : पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या काँग्रेसला आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) बाहेर काढणार का? हा प्रश्न पुन्हा उपस्थित होण्याचं कारण दिल्लीत झालेली एक गुप्त भेट आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर प्रशांत किशोर हे काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी या दोघांनाही भेटल्याचं कळतंय. त्यामुळे ज्या प्रशांत किशोर यांची मदत आधी काँग्रेसनं नाकारली होती, त्याच प्रशांत किशोर यांच्यावर पक्ष आाता विश्वास ठेवणार का हे पाहणं महत्वाचं असेल.
प्रशांत किशोर हे जवळपास वर्षेभरापूर्वीच राहुल प्रियंका गांधींना भेटलेले होते. त्यावेळी 2024 च्या दृष्टीनं भाजपला हरवण्यासाठी ते प्लॅन आखत असल्याचं बोललं जात होतं. अगदी प्रशांत किशोर थेट काँग्रेसमध्ये सहभागी होणार अशा पद्धतीच्या चर्चाही त्यावेळी सुरु होत्या. पण ज्या व्यक्तीनं 2014 ला मोदींसोबत काम केलेलं आहे, त्यावर इतका विश्वास टाकायला पक्षातलेच अनेक नेते तयार नव्हते.
काँग्रेसपासून दुरावल्यानंतर मधल्या काळात ब-याच घडामोडी घडल्या. प्रशांत किशोर हे तृणमूल काँग्रेससोबत काम करत आहेत. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अनेक काँग्रेस नेत्यांचे प्रवेश झाले. गोव्यात तर तृणमूल काँग्रेसनं निवडणूक लढवत काँग्रेसची वाट अवघड करुन टाकली. दोन आमदार तृणमूल काँग्रेसचे निवडून आले. या वर्षाअखेरीस गुजरात, हिमाचल प्रदेश आणि त्यानंतर कर्नाटक सारख्या महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका आहेत. या तीनही राज्यांत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. पण सोबतच पंजाब जिंकल्यानंतर आम आदमी पक्ष आता गुजरातमध्येही लक्ष ठेवून आहे. त्याचमुळे काँग्रेसला आव्हान खडतर असणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस आणि प्रशांत किशोर पुन्हा एकमेकांशी जुळवून घेणार का हे पाहणं महत्वाचं असेल. या भेटीबाबत अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेसमधल्या अनेकांना प्रशांत किशोर यांच्या आधीच्या भाजप संबंधाबद्दल, त्यांच्या कार्यशैलीबद्दल प्रश्न आहेत. त्यामुळे या भेटींमधून नेमकं काय साकार होतं, आणि खरंच काँग्रेसला संजीवनी देण्यात प्रशांत किशोर यांची भूमिका निर्णयाक ठरते का हे पाहावं लागेल.