प्रसाद लाड म्हणाले, भाजपचा पाठिंबा अमित ठाकरेंना; समाधान सरवणकरांकडून जशास तसं उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तीन तास बंडखोरीवरुन खलबतं सुरू असल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर असून अवघे काही तासच उतरले आहेत. त्यामुळे, बंडखोर उमेदवारांना विनवणी करुन, समजूत घालून आणि इशारा देऊन बडे नेते बंडखोरी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच, दुसरीकडे मुंबईतील माहीम मतदारसंघावरुन महायुतीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने माहीम (Mahim) मतदारसंघात अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचं सूचवलं आहे. मात्र, शिवसेना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर हे निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यावरुन, महायुतीमध्येच वाद पाहायला मिळत आहे. प्रसाद लाड यांनी भाजपची भूमिका ही अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर, आता सदा सरवणकर (Sada sarvankar) यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांनी ट्विट करुन प्रसाद लाड यांच्यावर पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तीन तास बंडखोरीवरुन खलबतं सुरू असल्याचं पाहायला मिळालं. त्यात, माहिम, अंधेरी पूर्व आणि राज्यातील इतर बंडखोर मतदारसंघात उभ्या असलेल्यांसंदर्भात देखील चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. माहिम मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आणि गड राहिलेला आहे. त्यामुळे, प्रामुख्याने सरवणकर यांच्या उमेदवारीवरुन देखील दोन्ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडून याआधीच स्पष्ट करण्यात आलंय की माहिममध्ये भाजप अमित ठाकरेंना पाठिंबा देणार. त्यावरुन आता समाधान सरवणकर यांनी भूमिका घेत प्रसाद लाड यांच्यावर पलटवार केला आहे.
प्रसाद लाड साहेब, जो माणूस जनतेमध्ये काम करतो आणि जनता ज्याला निवडून आणते त्याला विधानपरिषदेची लालच नसते. दादरमध्ये शिवसेना भाजप युतीचा धनुष्यबाणाचा उमेदवार नसणं हे किती शरमेची बाब होईल हे समजण्यासाठी शिवसैनिक असणे गरजेचे असते. महाराष्ट्रामध्ये काय चित्र जाईल, ज्या ठिकाणी शिवसेनेचा जन्म झाला त्या विधानसभेमध्ये धनुष्यबाण नाही, असे ट्विट करत समाधान सरवणकर यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, उद्या दुपारी 3 नंतर सरवणकर यांच्याकडून उमेदवारी कायम राहिल्यास भाजपचा नेमका पाठिंबा कोणाला हे स्पष्ट होऊ शकेल.
@PrasadLadInd लाड साहेब जो माणूस जनतेमध्ये काम करतो आणि जनता ज्याला निवडून आणते त्याला विधानपरिषद ची लालच नसते आणि दादर मध्ये शिवसेना भाजप युतीचा धनुष्यबाणचा उमेदवार नसणं हे किती शरमेची बाब होईल हे समजण्यासाठी शिवसैनिक असणे गरजेचे असते महाराष्ट्र मध्ये काय चित्र जाईल ज्या ठिकाणी…
— Samadhan Sarvankar (@samadhan234) November 3, 2024
काय म्हणाले होते प्रसाद लाड
अमित ठाकरे आमचा मुलगा आहे. आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करणार...अमित ठाकरेंना आम्ही निवडून आणणार, असं प्रसाद लाड यांनी म्हटले. तसेच सदा सरवणकर ज्येष्ठ नेते आहेत, ते सध्या सिद्धिविनायक मंदीराचे अध्यक्ष आहेत. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देखील दिला आहे. एकनाथ शिंदे त्यांना विधानपरिषदेवर संधी देतील. त्यामुळे सदा सरवणकर उमेदवारी अर्ज माघार घेतील, असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना समजवतील. पण आम्ही मनसेला मदत करु...मनसेने आम्हाला मदत केली आहे. त्यामुळे उद्या आम्ही चार वाजेपर्यंत वाट बघू, अशी भूमिका प्रसाद लाड यांनी मांडली आहे. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दिवाळी संपल्यानंतर म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून प्रचाराला जोर आणखी वाढताना दिसेल.
हेही वाचा
प्रकाश आंबेडकरांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज; 4 - 5 दिवसांत विधानसभेच्या प्रचारात येणार