काँग्रेसची 10 तारखेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर...; EVM विरोधात स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करताच प्रकाश आंबेडकरांनी मांडली भूमिका
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यव्यापी ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी अभियानाला आजपासून सुरूवात केली आहे.
अकोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम (EVM) मशीनवर आरोप केले जात आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यव्यापी ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी अभियानाला आजपासून सुरूवात केली आहे. आंबेडकरांनी आपल्या अकोल्यातील 'यशवंत भवन' निवासस्थानी स्वाक्षरी करीत अभियानाचा प्रारंभ केला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान राज्यभरात वंचितचे हे स्वाक्षरी अभियान चालणार आहे.
ईव्हीएमसंदर्भात भूमिका घेण्यासाठी काँग्रेसची 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहणार आहोत. त्यानंतर ईव्हीएमच्या मुद्द्यावर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार आहोत, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. तसेच ईव्हीएमच्या मुद्द्यावर देशव्यापी यात्रा काढण्याची काही गरज नसल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यात्रेला विरोध केलाय.
अकोला येथे झालेली पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ईव्हीएम संदर्भात काँग्रेसने पुढाकार न घेतल्यास आम्ही पुढाकार घेऊ. आम्ही काँग्रेसची 10 तारखेपर्यंत वाट पाहू. त्यानंतर ईव्हीएमच्या मुद्द्यावर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका खारीज करायला नको होती. याचिका खारीज करणे न्यायाला धरून नाही. नवीन सभागृह गठीत करता येऊ शकते का? असा सवाल आंबेडकरांनी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाला केला.
ईव्हीएम संदर्भात कोणीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये
29 नोव्हेंबरला दुपारी बारा वाजेपर्यंत सरकारचा शपथविधी होणे आवश्यक होते. आता सभागृह स्थापन होऊ शकते का?, याचे उत्तर महाराष्ट्राच्या अॅडव्होकेट जनरल यांनी द्यावे. काही उमेदवार ज्या मतदारांनी आपल्याला मतदान केलं आहे त्यांचे एफिडेव्हीट घेऊन हा सर्व प्रकार पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीच्या काळात केंद्रीय आणि महाराष्ट्र गुप्तचर यंत्रणेने संभाव्य विजेत्या उमेदवारांची यादी तयार केली होती ती यादी जाहीर करावी. जे अधिकारी दबाव मानणार नाहीत त्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. नांदेडमध्ये काही ईव्हीएमचे नंबर मॅच झाले नाहीत. व्हीव्हीपॅट मोजण्याची किंमत आणि लागणारा खर्च अधिक असल्यामुळे कोणी ते करण्यासाठी धजावत नाहीत. ईव्हीएम संदर्भात कोणीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये. जे सर्वोच्च न्यायालयात जातील ते भाजपाचे दलाल आहेत. याचा जाब निवडणूक आयोगाला विचारा, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा