पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे ब्लॅकमेलर, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
काँग्रेसनं देशभरात आघाडी का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसने कुणासोबतच आघाडी करु नये यासाठी भाजपनेच खोडा घातल्याचं आंबेडकरांनी म्हटलं आहे.
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. निवडणून आयोगाच्या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे ब्लॅकमेलर असल्याची गंभीर टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रांसाठी भाजपनं त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. काँग्रेसने कुणासोबतच आघाडी करु नये यासाठी भाजपनेच खोडा घातल्याचं आंबेडकरांनी म्हटलं आहे.
काँग्रेसनं देशभरात आघाडी का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आप आघाडीसाठी तयार असताना दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्यामुळे आघाडी न झाल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे.
याशिवाय शिला दीक्षित यांचे पुण्याच्या एका भ्रष्टाचारी नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप करत प्रकाश आंबेडकरांनी नाव न घेता सुरेश कलमाडी यांच्यावर टीका केली.
...तर निवडणूक आयोगाला तुरुंगाची हवा खायला पाठवू
निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकण्याच्या प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती. पुलवामाच्या घटनेवर काही बोललं, की निवडणूक आयोग बंदी लावतं. ही यंत्रणा भाजपच्या हातातील बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या, यांना दोन दिवस तुरुंगाची हवा खायला पाठवल्याशिवाय राहणार नाही" असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं. याप्रकरणी प्रकाश आंबेडकरांविरोधात यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिग्रज पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.