शिंदेसेनेचा बालेकिल्ला खेचण्याचे भाजपचे प्रयत्न अयशस्वी; पालघरसह डहाणू नगरपरिषदेवर शिंदेसेनेचाच भगवा, भाजपला धूळ चारली
पालघर जिल्ह्यात भाजपकडून मंत्री गणेश नाईक , खासदार हेमंत सावरा आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Palghar Nagar parishad election Result 2025: शिंदे सेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पालघर जिल्ह्यातील पालघर आणि डहाणू या दोन्ही नगरपरिषदांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. पालघर नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम घरत जवळपास 4000 मताधिक्याने विजयी झालेत. त्यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास म्हात्रे यांचा दारुण पराभव केलाय.
दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गट आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची असलेल्या डहाणू नगरपरिषदेतदेखील शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारली असून शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र माच्छी 3325 इतक्या मताधिक्याने विजयी झाले असून त्यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा पराभव केलाय . ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने डहाणूमध्ये भाजप विरुद्ध शिंदेसेना असा थेट सामना झाला.
शिवसेनेचा बालेकिल्ला खेचण्याचे डावपेच फोल
पालघर जिल्ह्यात भाजपकडून मंत्री गणेश नाईक , खासदार हेमंत सावरा आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यासह माजी आमदार रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती . पालघर नगरपरिषद हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असला तरी शिवसेना पक्ष फुटीनंतर हा बालेकिल्ला भाजपने आपल्याकडे खेचण्यास डावपेच सुरू केली होते . मात्र शिवसेना शिंदे गटाने भाजपचा हा डाव उधळून लावला असून नगराध्यक्ष पदांसह 30 नगरसेवक पदांपैकी तब्बल 19 नगरसेवक निवडून आणत पालघर नगर परिषदेत आपला भगवा शिवसेना शिंदे गटाने कायम ठेवला आहे .
डहाणूत भाजपचा गड आला पण सिंह गेला ..
डहाणू नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे 2 नगरसेवक निवडून आले असून भाजपचा गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती झाली असून भाजपचे 17 नगरसेवक निवडून आले आहेत मात्र नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. डहाणू नगरपरिषदेत 27 जागांपैकी भाजपने आपले 17 नगरसेवक निवडून आणले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ तर शिवसेना शिंदे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत . भाजपला एकाकी पाडत शिवसेना शिंदे गटाने इतर सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवला असून सर्व एकत्र आले तरी देखील आमचा विजय पक्का आहे,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणूत प्रचारादरम्यान व्यक्त केला होता . त्याचबरोबर आम्ही भाजप विरोधात नाही परंतु एकाधिकारशाहीच्या विरोधात असून रावणाचा अहंकार मोडीत काढला पाहिजे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डहाणूमध्ये बोलून दाखवलं होतं.





















