Nitesh Karale VIDEO : कराळे मास्तरांना मारहाण, मतदान करून परत येत भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली शिवीगाळ
Nitesh Karale Sir : वर्ध्यातील उमरी मेघे गावाचे उपसरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कराळे मास्तरांना मारहाण करत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.
वर्धा: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याची घटना घडली. कराळे मास्तरांच्या मांडवा या गावात त्यांना मारहाण करण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केला. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण झाल्यानंतर कराळे मास्तरांनी वर्ध्यातील सावंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणानंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं.
वर्ध्यातील मांडवा या गावातून मतदान करून परत येत असताना कराळे मास्तरांना ही मारहाण झाली. उमरी मेघे येथील उपसरपंच सचिन कोसे यांनी कराळे मास्तरांना मारहाण केली. यावेळी मारहाण करणाऱ्यांनी कराळे मास्तरांना शिवीगाळ केल्याचंही दिसून येतंय. तुम्हाला मारहाण करण्याचा कोणताही अधिकार नाही असं कराळे मास्तर त्यांना म्हणताना दिसत आहेत. पण तरीही समोरून शिवीगाळ होताना व्हिडीओमध्ये दिसतंय.
भाजपच्या माजलेल्या लोकांकडून हल्ला
या घटनेवर कराळे मास्तरांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "मी मतदान करून शांतपणे चाललो होतो. एकही शब्द बोलला नाही. पण समोरचा व्यक्ती माझ्या अंगवार आला. त्याने मला आईवरून शिव्या दिल्या, माझा कॉलर पकडला. भाजपच्या नेत्यांनी पोसलेली ही लोक माजलेली आहेत. ती अशी अरेरावी करतात."
Who Is Nitesh Karale : कोण आहेत कराळे मास्तर?
नितेश कराळे हे कराळे मास्तर म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुण्यामध्ये जाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. त्यामध्ये यश आलं नसल्याने त्यांनी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे क्लास सुरू केले.
सुरुवातीला पुणेरी पॅटर्न असं त्या क्लासचे नाव ठेवले. मात्र कराळे सर आणि त्यांची खास वऱ्हाडी गावरान भाषेचं पुणेरी पॅटर्न या भारदस्त नावासोबत जुळलं नाही. मग काय कराळे गुरुजींनी आपल्या भाषेतील खास गावरान शैलीलाच जमेची बाजू बनवून रंजक पद्धतीने शिकवायला सुरुवात केली.
सुरुवातीला वर्गापुरतं मर्यादित राहिलेली त्यांची शिकवणुकीची शैली कोरोनाच्या काळात ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. त्यांचे व्हिडीओ वायरल होऊ लागले आणि त्यांना लाखोंनी व्ह्यूज येऊ लागले.
आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाच्या माध्यमातून कराळे मास्तरांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात, महागाई आणि बेरोजगारीविरोधात आवाज उठवला. यासंबंधित त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही. कराळे मास्तरांनी विधानसभेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला.
ही बातमी वाचा: