एक्स्प्लोर
राष्ट्रवादीचा माढ्याचा तिढा सुटल्याचे संकेत, संजय शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
शरद पवारांनी मोहिते पाटलांना माढ्यातून उभं राहण्यासाठी बऱ्याचदा विनंती केली, मात्र मोहिते पाटलांना माढ्यातून तिसराच उमेदवार उभा करायचा होता, असा दावा अजित पवार यांनी मावळच्या सभेत केला.
पंढरपूर : राष्ट्रवादीला माढ्याचा तिढा सोडवण्यात यश आल्याचं दिसत आहे. माढ्यातून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे, तर उस्मानाबादेतून राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. संजय शिंदे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची चिन्हं आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भाजप समर्थनाने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या संजय शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. माढा मतदारसंघातून शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार होते. मात्र एकाच कुटुंबातून अनेक सदस्य नको आणि नातू पार्थ पवारांना निवडणुकीत नशिब आजमावता यावं, यासाठी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर माढ्याचा तिढा सुटता सुटत नव्हता.
मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळत नसल्याचं चित्र पाहून रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. मात्र आता संजय शिंदेंना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची राष्ट्रवादीने तयारी केलेली दिसते.
दरम्यान, आज दुपारी चार वाजता शरद पवार यांची बारामतीमधल्या गोविंदबाग या निवासस्थानी पत्रकार परिषद होणार आहे. यात शरद पवार माढ्यातील उमेदवाराची घोषणा करतील असं म्हटलं जात आहे.
कोण आहेत संजय शिंदे?
- शिवसेना-भाजपच्या मदतीने सध्या सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत.
- माढा राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे यांचे लहान भाऊ आणि मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.
- निमगाव 'टेंभुर्णी'च्या सरपंचपदापासून राजकारणाला सुरुवात
- 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव
- जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले.
- पालकमंत्री विजय देशमुख यांच्या मदतीने अध्यक्ष झाले.
- म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन या साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विठ्ठल सूतगिरणीचे अध्यक्ष.
- माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन
- जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष
- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद, माढा तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही भूषवलं.
VIDEO | माढ्यात राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
विजयसिंहांना माढ्यातून लढण्याची विनंती केली होती : अजित पवार
दरम्यान, शरद पवारांनी मोहिते पाटलांना माढ्यातून उभं राहण्यासाठी बऱ्याचदा विनंती केली, मात्र मोहिते पाटलांना माढ्यातून तिसराच उमेदवार उभा करायचा होता, असा दावा अजित पवार यांनी मावळच्या सभेत केला. तर विजयसिंह मोहितेंना फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन बंद ठेवल्याचंही ते म्हणाले.
राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते-पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास सांगितलं होतं. पण विजयसिंह मोहिते-पाटील यांनी स्वतःऐवजी दुसरं एक नाव सुचवलं होतं. पण त्या नावाला माढा लोकसभा मतदारसंघातील आमदारांचा विरोध होता. त्या बैठकीला मी उपस्थित होतो, साक्षीदार होतो. विजयसिंह मोहिते-पाटील यांना जयंत पाटील आणि शरद पवारांच्या पीएनी फोन करण्याचा प्रयत्न केला. पण विजयदादांनी फोन स्वीच ऑफ केला होता, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, उस्मानाबादच्या जागेचा प्रश्नही सुटताना दिसत आहे. सोलापुरातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 23 तारखेला याबाबत अधिकृत घोषणा होण्याचे संकेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement