Nashik Gram Panchayat Election : कारभारी लय भारी! पत्नी सरपंच तर पती उपसरपंच, नाशिकमध्ये 'ही' ग्रामपंचायत एकाच घरात
Nashik Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांत दिंडोरी तालुक्यात विस्मयकारक निकाल लागला आहे. जऊळके येथील ग्रामपंचायतीत पत्नीची सरपंच तर पतीची उपसरपंच म्हणून निवड झाली आहे.
Nashik Gram Panchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुल वाजला असून मागील काही दिवसांत 88 ग्रामपंचायतींची निवडणूक (Gram Panchayat Election) प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांत दिंडोरी तालुक्यात विस्मयकारक निवडणूक झाली आहे. जऊळके येथील ग्रामपंचायतीत पत्नीची सरपंच तर पतीची उपसरपंच म्हणून निवड झाली आहे.
राजकारणात केव्हा काय होईल सांगता येत नाही. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणत्याही अशक्य गोष्टीला शक्य करता येते. शिवाय लोकांचा पाठिंबा ही मोठी जमेची बाजू ठरते. याची प्रचिती नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जऊळके ग्रामपंचायतीला आली आहे. तालुक्यातील जऊळके ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पत्नी तर उपसरपंचपदी तिचा पती विराजमान झाल्याने एकाच घरात अख्खी ग्रामपंचायत आली आहे.
एकाच घरात सरपंच आणि उपसरपंचपद
नाशिक जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. आताही जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. यात काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक रंगली आहे. अशातच दिंडोरी तालुक्यातील जऊळके ग्रामपंचायतीने मात्र इतिहास घडवला आहे. एकीकडे ग्रामपंचायत सदस्य होणे मुश्किलीची गोष्ट असताना मात्र इथे एकाच घरात सरपंच आणि उपसरपंचपदाची माळ पडल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे.
भारती तुकाराम जोंधळे यांची सरपंचपदी जनतेतून निवड झाली होती. तर उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत पती तुकाराम हिरामण जोंधळे यांची निवड झाली. पत्नीची सरपंच आणि पतीची उपसरपंचपदी निवड झाल्याचा परिसरातील पहिलाच योग असल्याने जोंधळे दाम्पत्याचं विशेष कौतुक होत आहे.
जऊळके-दिंडोरी येथील उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तुकाराम हिरामण जोंधळे आणि कुणाल प्रकाश बागुल हे दोन अर्ज प्राप्त झाल्यानंतर माघारीच्या मुदतीत माघार न झाल्याने निवडणूक घेण्यात आली. यात तुकाराम जोंधळे यांनी सहा तर कुणाल बागुल यांना पाच मते मिळाल्याने तुकाराम जोंधळे यांना विजयी घोषित करुन उपसरपंचपदी त्यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर केले.
"आम्ही संधीचे सोनं करु," नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच पती-पत्नीचा निर्धार
यावेळी सरपंच आणि उपसरपंच पती-पत्नी म्हणाले की, "गावाने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आमच्यावर मोठी जबाबदारी पडली आहे. लोकांच्या कल्याणासाठी गावाच्या विकासासाठी आम्ही संधीचे सोनं करु." यावेळी अंबाबाई बागुल, अरुणा वाघ, भगवंत गोतरणे, रुपाली उजे, आशा गांगुर्डे, आशा जोंधळे, खंडु गोतरणे आदी सदस्य उपस्थित होते.