MVA seat sharing: बाळासाहेब थोरातांनी मातोश्रीवर पाऊल ठेवताच मविआचा नवा फॉर्म्युला समोर, 105-85-70, कोणाला किती जागा?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मविआचे जागावाटप आता पूर्ण होईल, असे सांगितले जाते. मविआच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता.
मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु असल्याने महाविकास आघाडीत काहीसा तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मविआतील ज्येष्ठ नेत्यांनी चर्चेचा सूत्रं हाती घेत मविआचे गाडे पुन्हा रुळावर आणले आहे. काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे मविआत (MVA seat Sharing) तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आता काँग्रेसने अनुभवी नेतृत्व असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेच सूत्रं सोपवली होती. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मंगळवारी सकाळी मुंबईत येत प्रथम शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले.
बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. या फॉर्म्युलानुसार, काँग्रेस पक्ष 110 जागांवर लढणार होता. यापैकी 5 जागा चर्चेअंती कमी जास्त होण्याची शक्यता आहे. तर ठाकरे पक्ष 90 जागांवर लढणार होता. यामध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पाच जागा कमी होऊ शकतात. तर शरद पवार गट 75 जागांवर लढणार होता. मात्र, आता तडजोड करण्यासाठी हा जागांचा आकडा वरखाली होण्याची शक्यता आहे.
हे जागावाटप करताना मविआच्या मित्रपक्षांचाही विचार करण्यात आला आहे. या जागांचे वाटप झाल्यानंतर समाजवादी पक्षाला सामावून घेण्यासंदर्भात निर्णय होईल, असे सांगितले जाते. आज दुपारी मविआच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक पार पडेल. यानंतर ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महायुतीचं जागावाटप 25 जागांमुळे अडलं
महायुतीचे जागावाटप 25 जागांमुळे रखडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावणकुळे आणि प्रफुल पटेल यांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. भाजपने पहिली जागा जाहीर केल्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 60 नावांची यादी बैठकीत मांडल्याची सूत्रांची माहिती आहे. यावेळी विद्यमान आमदारांना तिकिट देण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. उर्वरित २५ जागांचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आल्याचे कळते. त्यावर स्थानिक पक्षीय बलाबल, जातीय राजकारण या जागांवर तीन पक्षातील प्रमुख नेते बसून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
आणखी वाचा
मोठी बातमी : डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा, विधानसभेच्या रणधुमाळीत छापेमारी