एक्स्प्लोर
मोदी-शाहांविरोधात सभा घेणार, राज ठाकरेंची घोषणा, फडणवीसांचाही समाचार
आगामी लोकसभा निवडणूक ही मोदी-शाह विरुद्ध देश अशी असेल. यापुढे मी ज्या सभा घेईन त्या नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्याविरोधातल्या असतील, असं स्पष्टीकरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं.
मुंबई : नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही दोन माणसं देशाच्या राजकीय पटलावरुन बाजूला होणं गरजेचं आहे, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान-भाजपाध्यक्षांच्या जोडगोळीवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात मनसे उतरणार नसलं, तरीही मोदी आणि शाहा यांच्याविरोधात सभा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली. सध्या मोदींच्या विरोधातल्या प्रचाराचा फायदा ज्यांना व्हायचा त्यांना होऊ देत, तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेशही राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले.
मोदी आणि शाह यांच्या विरोधात देशातील नेत्यांनी आणि पक्षांनी एकत्र यायला हवं हे बोलणारा मी पहिला नेता होतो. गेल्या वर्षी गुढीपाडवा मेळाव्यातच मी हे आवाहन केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मी योगायोगाने अनेकदा एकत्र आलो. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, आम्हाला मनसे सोबत हवी आहे. मी त्यांना फोन करुन कुठं भेटता येईल विचारलं. एक दिवस काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचाही फोन आला आणि भेटणं झालं. मी अजित पवारांना आणि अशोक चव्हाणांना विचारलं की मी तुम्हाला कधी सीट्स मागितल्या, कधी युतीची चर्चा केली? यावर ते 'नाही' म्हणाले. मग तुम्ही माध्यमांसमोर का बोलत सुटलात? असा प्रतिप्रश्न मी त्यांना विचारला. मी कुणाकडेही सीट मागितली नाही, युती करु म्हटलं नाही, कर नाही तर मला डर कशाला? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
आगामी लोकसभा निवडणूक ही मोदी-शाह विरुद्ध देश अशी असेल. यापुढे मी ज्या सभा घेईन त्या नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्याविरोधातल्या असतील, असं राज यांनी स्पष्ट केलं. आपली लढाई ही कोणत्याही विशिष्ट पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह या दोघांच्या विरोधात आहे. त्यांच्या उमेदवारांना मतदान न करणं आणि त्यांना मदत न करणं हाच उद्देश आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह नकोत, म्हणून भाजपला मतदान करु नका, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
बारामतीचा पोपट
मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना 'बारामतीचा पोपट' असं संबोधलं होतं. या टीकेचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार घेण्यात आला. देवेंद्र फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा असल्याची बोचरी टीकाही राज यांनी केली.
'चौकीदार चोर'कडे दुर्लक्ष करा
भाजपकडून चौकीदारचं कॅम्पेन सुरु आहे, त्यामुळे निवडणूक भारताची आहे की नेपाळची? हेच कळत नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपची खिल्ली उडवली. या चौकीदारच्या भानगडीत पडू नका. तुम्ही प्रश्न विचारु नयेत म्हणून ही गिमिक आहेत. हे कॅम्पेन म्हणजे तुमचं लक्ष हटवण्यासाठी फार्स आहे, ट्रॅप आहे, याकडे लक्ष देऊ नका, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
भाजपची लोकं तुमच्याकडे येतील, त्यांनी तुमच्यासमोर थैल्या रिकाम्या केल्या तर घ्या, त्यांनी देश लुटलाय, तुम्ही त्यांना लुटलं तर हरकत नाही, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.
एअर स्ट्राईकबाबत धादांत खोटी माहिती पसरवली जात आहे, खोट्या फोटोंच्या आधारे खोटा प्रचार केला जात आहे. माणूस बदलला म्हणून माझं मतही बदललं, असं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिलं.
UNCUT | मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यातील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण
रिझर्व्ह बँकेकडे पैशांची मागणी
सरकारने रिझर्व्ह बँकेकडे तीन लाख कोटींची मागणी केली आणि या मागणीला तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी विरोध केला, म्हणून त्यांना जावं लागलं. म्हणजे या सरकारकडे पैसे नव्हते आणि हे युद्ध करायला निघाले होते, असा घणाघातही राज ठाकरेंनी केला.
नरेंद्र मोदींनी शरद पवार, बारामतीचं राजकारण आणि काका-पुतण्यावर ओढलेल्या ताशेऱ्यांच्या भाषणाची चित्रफीत आधी राज ठाकरेंनी लावली. त्यानंतर पवारांची बारामती आणि त्यांच्या दूरदृष्टीवर स्तुतिसुमनं उधळतानाचेही व्हिडिओ सादर करण्यात आले. त्यानंतर मोदींसारखा खोटा पंतप्रधान मी आजवर पाहिला नसल्याचंही राज म्हणाले.
मी 9 मार्चच्या भाषणात पुलवामाबद्दल प्रश्न विचारले होते. मात्र फडणवीस आणि भाजप नेते उत्तर देण्याऐवजी भलतंच बोलत बसले. कारण यांच्याकडे त्या प्रश्नांची उत्तरंच नाहीत, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली..
प्रधान सेवक नेहरुंचा शब्द
नरेंद्र मोदी स्वतःला 'प्रधान सेवक' म्हणवतात पण हा मूळ शब्द भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंचा आहे, तीन मूर्ती भवनात एका तसबीरीवर 'देशानं मला प्रथम सेवक समजावं' हे नेहरुंचं वक्तव्य लिहिलं असल्याचं राज यांनी सांगितलं.
सध्या मोदींच्या विरोधातल्या प्रचाराचा फायदा ज्यांना व्हायचा त्यांना होऊ देत, तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेशही राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement