एक्स्प्लोर
मिरा भाईंदर विधानसभा | यंदाही भाजपच्या नरेंद्र मेहतांनाच पसंती मिळणार?
यंदा भाजपाचे विद्यमान उमेदवार नरेंद्र मेहताच निवडणूकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या मतदार संघात गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय, मराठी समाज मोठ्या प्रमाणात नरेंद्र मेहतांकडे असल्याने त्यांची ही जमेची बाजू आहे. त्यातच शिवसेनबरोबर युती झाल्याने त्यांची ही मते अधिक प्रमाणात मेहतांना मिळतील.
मीरा भाईंदर : मीरा-भाईंदर मतदार हा संघ 2009 साली अस्तित्वात आला. 2009 ला सेना भाजपाचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना पराभूत करुन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गिल्बर्ट मेंडोसा हे विजयी झाले होते. त्यानंतर मात्र 2014 साली मोदी लाटेत, सेना भाजपाची महायुती झाली नव्हती तरी ही भाजपाचे उमेदवार नरेंद्र मेहता हे विजयी झाले होते. त्यावेळी नरेंद्र मेहता यांना 97,468, राष्ट्रवादीचे उमेदवार गिल्बर्ट मेंडोसा यांना 59,176 , काँग्रेसच्या याकूब कुरेशी यांना 19,489, तर शिवसेनेच्या प्रभाकर म्हाञे यांना 18,171 मते मिळाली होती.
ऑगस्ट 2017 ला झालेल्या मिरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपाच्या नरेंद्र मेहता यांनी महापालिकेत एक हाती भाजपाची सत्ता आणली. 24 प्रभागातील 95 जागांपैकी तब्बल 61 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी शिवसेनेला 22, काँग्रेसला 10 तर राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी 4,12,145 मताधिक्यांनी ठाणे लोकसभेतून निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे हा रेकॉर्ड पहाता यंदाच्या मिरा भाईंदर विधानसभा निवडणुकीत भाजपाच नंबर 1 वर आहे.
यंदा भाजपाचे विद्यमान उमेदवार नरेंद्र मेहताच निवडणूकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मेहताच्या विरोधात काँग्रेसचे अतिरिक्त प्रदेशाध्यक्ष मुजफ्फर हुसैन हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत. यापूर्वी दोन निवडणुकांमध्ये मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने लढत दिली होती. मात्र 2014 च्या केंद्रातील राजकीय उलथापालथीनंतर शहरातील राष्ट्रवादीची ताकद क्षीण झाली होती. आता तर राष्ट्रवादी मिरा भाईंदरमधून संपल्यातच जमा आहे. स्वतः गिल्बर्ट मेंडोसा हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका सभेत हा मतदारसंघ काँग्रेसला देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं होतं.
मुस्लिम समाजामध्ये हिरो असलेले मुजफ्फर हुसैन हे मेहतांना टक्कर देवू शकतात. मिरा भाईंदर क्षेत्रात नया नगर परिसरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतो. तसेच खुद मुजफ्फर हुसैन राहतात. मुस्लिम समाजाची या मतदार संघात अंदाजे 10 ते 12 टक्के मते आहेत. तर मेहतांवर कांदनवळनाचा ऱ्हास करण्याचं भ्रष्टाचाराच प्रकरण ताजं आहे. तसेच मेहतांच्या विरोधात काही गट नाराज आहे. तो नाराज गटाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न मुजफ्फर हुसैन यावेळी करणार आहेत.
या मतदार संघात जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. या मतदार संघात गुजराती, मारवाडी, जैन समाज हा अंदाजे 25 टक्के एवढा आहे. त्याचबरोबर उत्तर भारतीय समाज हा ही अंदाजे 25 टक्के आहे. तर मराठी टक्का अंदाजे 15 टक्के आहे. त्यामुळे हा संपूर्ण समाज मोठ्या प्रमाणात नरेंद्र मेहतांकडे असल्याने त्यांची ही जमेची बाजू आहे. त्यातच शिवसेनबरोबर युती झाल्याने त्यांची ही मते अधिक प्रमाणात मेहतांना मिळतील. मात्र मेहतांना अंतर्गत गटबाजीचा फटका बसू शकतो. मिरा भाईंदरचे प्रथम महापौर गीता जैन या मेहताच्या कट्टर विरोधक मानल्या जातात. पक्षात असून ही, मेहता आणि त्यांच्यात अधून-मधून राजकीय खटके उडत असतात.
मतदारसंघातील समस्या
- शहरातील घनकचरा प्रकल्प अजूनही कार्यान्वीत झालेला नाही.
- नाट्यगृहाचं काम अपूर्ण
- अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी,
- तहसीलदार कार्यालयाचा अभाव
- धोकादायक इमारतीचा प्रश्न
- मोठं आधुनिक सुसज्ज असं रुग्णालय नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement