Sunil Kedar: 'याद राखा माझी चक्की चालेल, तेव्हा तुम्हाला खूप भारी पडेल'; सुनील केदारांचा विरोधकांना इशारा
. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल आणि त्यामध्ये सुनील केदार 100% असेल असा दावाही केदार यांनी यावेळी केला.
Nagpur: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्नी अनुजा केदार यांचा सावरनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर डिसेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुम्हाला सुनील केदार दिसेल असं म्हणत माजी मंत्री सुनील केदार यांनी विरोधकांना चांगलाच दम भरल्याचं दिसलं. 'याद राखा माझी चक्की चालेल, तेव्हा तुम्हाला खूप भारी पडेल' असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला. सावरनेर मध्ये पत्नी अनुजा केदार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली. यातच विधानसभेचे सदस्यत्व रद्द झाले. सावरनेर विधानसभा मतदारसंघातून कोण लढणार याची चर्चा सुरू असतानाच आपल्या पत्नीचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत त्यांनी विरोधकांना भर सभेत इशारा दिल्याचे दिसले.
.. तेव्हा तुम्हाला निवडणूक भारी पडेल
जेव्हा सुनील केदारची चक्की चालेल तेव्हा तुम्हाला खूप भारी पडेल.. आणि याद राखा सुनील केदारची चक्की चालणार. मी तुम्हाला लिहून देतो डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुम्हाला सुनील केदार दिसेल. असा दावा करत सुनील केदार यांनी विरोधकांना इशारा दिल्याचे दिसले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल आणि त्यामध्ये सुनील केदार 100% असेल असा दावाही केदार यांनी यावेळी केला.
पत्नीला निवडणुकीत उतरवून रिस्क घेतली..
सत्ताधारी सुडाचे राजकारण करत आहेत. तरीही अशा वातावरणात मी माझ्या पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. मला माहित आहे मी खूप मोठी रिस्क घेतली आहे असे सुनील केदार म्हणाले.
वाळू माफियांना भर सभेत समर्थन!
सावरनेर मध्ये पत्नी अनुजा केदार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेत माजी मंत्री सुनील केदार यांनी वाळूच्या अवैध व्यवसायाचं समर्थन केल्याचंही दिसलं. वाळूचा व्यवसाय करणाऱ्या विरोधात सरकारी अधिकारी कारवाया करतात.. त्यांचे ट्रॅक्टर व ट्रक जप्त करतात. दोन-चार तरुणांनी थोडीफार वाळून नेली तर तुम्हाला काय फरक पडतो असा सवाल करत सुनील केदार यांनी वाळूच्या अवैध व्यवसायाला एक प्रकारे पाठिंबाच दर्शवल्याचे दिसलं. डिसेंबर महिन्यापासून सावरनेर आणि परिसरात वाळूचे ट्रक आणि ट्रॅक्टर बिनधास्तपणे चालतील असा दावाही त्यांनी भर सभेत त्यांनी केला.