प्रणिती शिंदेंनी दगाफटका केला, काँग्रेसला किंमत मोजावी लागेल, एबी फॉर्म न मिळाल्यानं दिलीप मानेंचे कार्यकर्ते आक्रमक
दिलीप माने (Dilip Mane) हेच काँग्रेसचे उमेदवार असतील असं सांगून देखील काँग्रेसनं (Congress) त्यांना आज एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळं दिलीप माने यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
Dilip Mane : सोलापूर दक्षिणमध्ये (South Solapur) आज नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. दिलीप माने (Dilip Mane) हेच काँग्रेसचे उमेदवार असतील असं सांगून देखील काँग्रेसनं (Congress) त्यांना आज एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळं दिलीप माने यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये स्वतःसोबत आणलेली काँग्रेसचे उपरणे, टोप्या आणि लोगो रागाच्या भरात जमिनीवर टाकून दिल्याचं पाहायला मिळालं. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या बाहेर सर्व प्रचार साहित्य रस्त्यावर फेकण्यात आले होते. प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि काँग्रेसने मोठा दगफटका केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दिलीप माने यांना काँग्रेसनं उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसची उमेदवारी दिलीप माने यांनाचं मिळेल असं आश्वासनं देखील दिलं होते. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत दिलीप माने यांना काँग्रेसचा एबी फॉर्म काही मिळाला नाही. त्यामुळं माने यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला आहे.
प्रणिती शिंदे आणि काँग्रेसने मोठा दगफटका केला
दिलीप माने यांना काँग्रेसने एबी फॉर्म न दिल्याने माने समर्थकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. प्रणिती शिंदे आणि काँग्रेसने मोठा दगफटका केल्याचा आरोप देखील कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी अनेक कार्यकर्त्यांचा डोळ्यात अश्रू आले. दिलीप माने यांनी अपक्ष फ्रॉर्म मागे घेऊ नये असेही कार्यकर्त्यांनी सांगितले. काँग्रेसला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. दिलीप माने यांनी सध्या अपक्ष फॉर्म भरला आहे. तर त्यांचा मुलगा पृथ्वीराज माने याने पूरक म्हणून अपक्ष फॉर्म भरला आहे.
काय म्हणाले दिलीप माने?
मला शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघण्यासाठी सांगण्यात आलं होतं. ऐन वेळी मला एबी फॉर्म दिला नाही.एबी फॉर्म होता पण माझ्यापर्यंत पोहोचवला नाही असे माने म्हणाले. मी आता अपक्ष अर्ज दाखल केला, कार्यकर्त्यांना विचारून अर्ज ठेवण्याबाबतीत निर्णय घेईन असेही माने म्हणाले. काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ असताना तो सोडला ही सगळी मॅच फिक्सिंग असल्याचे माने म्हणाले. प्रत्येक जण आपली बाजू सेफ करण्याचा प्रयत्न करतोय. आपली मुलगी, पत्नी कशी निवडून येईल यासाठी सगळं केलं जातं असल्याचे माने म्हणाले. ज्यांनी तिकीट जाहीर केलं त्यांची जबाबदारी होती की एबी फॉर्म देखील आणला पाहिजे. सगळेच यामध्ये कमी पडलेत. जिथं काँग्रेस उमेदवारला संधी न देता मित्र पक्षाला जागा सोडण्यात आली तिथं कोणीही विश्वास ठेवू नका असे माने म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: