(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kagal Vidhan Sabha : वीरेंद्र मंडलिक अर्ज भरणार की नाही? हसन मुश्रीफांच्या रॅलीत संजय मंडलिकांची मोठी घोषणा
हसन मुश्रीफ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रोहित पवार काय कोणतेही नेते प्रचारासाठी आले तरी माझा विजय निश्चित असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले.
Kagal Vidhan Sabha : कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांनी कागल विधानसभेला बंडखोरीची भाषा केली होती. त्यामुळे कागलमध्ये तिरंगी लढत होणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, आज (28 ऑक्टोबर) या चर्चेला खासदार संजय मंडलिक यांनी पूर्णविराम दिला. वीरेंद्र मंडलिक यांची आम्ही समजूत काढली असून वीरेंद्र मंडलिक उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, अशी माहिती संजय मंडलिक यांनी दिली.
महायुतीची एकी, ठाकरे गटाच्या संजय घाडगे यांनी सुद्धा पाठिंबा दिला
दरम्यान, आज वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री यांनी कागल विधानसभेला मोठ्या शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक सुद्धा उपस्थित होते. संजय मंडलिक यांनी बोलताना सांगितले की, हसन मुश्रीफ लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील. कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीची एकी असून ठाकरे गटाच्या संजय घाडगे यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे, असेही संजय मंडलिक यांनी सांगितले.
वीरेंद्र मंडलिकांकडून बंडखोरीची भाषा, जोरदार बॅनरबाजी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वीरेंद्र मंडलिक यांनी मेळावा घेत हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यावर घणाघाती हल्लाबोल केला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये वडील संजय मंडलिक यांचे दोघांनी सुद्धा काम केलं नसल्याचा आरोप वीरेंद्र मंडलिक यांनी केला होता. महायुतीने उमेदवारी आपल्याला द्यावी, हसन मुश्रीफ यांना प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका बसू शकतो, असेही त्यांनी म्हटले होते. कागल मतदारसंघात मंडलिक गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती.
त्यामुळे वीरेंद्र मंडलिक कागलमध्ये बंडखोरी करणार का? अशीच चर्चा रंगली होती. मात्र, आज मुश्रीफ अर्ज दाखल करत असताना संजय मंडलिक यांनीच वीरेंद्र मंडलिक अर्ज भरणार नसल्याचे सांगत एक प्रकारे सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे आता कागलमध्ये खरी तुल्यबळ लढत ही हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये असणार आहे.
मुश्रीफ म्हणाले, तरी माझा विजय निश्चित
दरम्यान, आज हसन मुश्रीफ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रोहित पवार काय कोणतेही नेते प्रचारासाठी आले तरी माझा विजय निश्चित आहे. आजची ही मिरवणूक विजयाची मिरवणूक आहे असं हसन मुश्रीफ म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या