(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule: ट्रम्पेट चिन्हाचे तुतारी मराठी भाषांतर रद्द झाल्याच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'फुल ना फुलाची पाकळी...'
Supriya Sule: निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्वागत केलं आहे. निवडणुकीच्या निर्णयावर पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे: निवडणूक आयोगाने ‘ट्रम्पेट’ चिन्हाचे ‘तुतारी’ हे मराठी भाषांतर रद्द करण्याचा निर्णय घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाचं नाव मात्र तुतारी वाजवणारा माणूस हे कायम ठेवलं आहे. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट या चिन्हाचा उल्लेख तुतारी असा करण्यात आल्यामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला होता. त्यानंतर निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्वागत केलं आहे. निवडणुकीच्या निर्णयावर पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
या निर्णयासाठी मी निवडणूक आयोगाचे आभार मानते. आमची विनंती होती ते चिन्ह यादीतून काढावं. पण, तसं काही झालं नाही. पण, फुल ना फुलाची पाकळी मिळाली. तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यातील गोंधळ होत होता, त्याचा फटका आम्हाला लोकसभेला बसला. याबाबत आम्ही सर्व आकडेवारी त्यांच्यासमोर मांडली होती. निवडणुका या देशात पारदर्शकपणे व्हाव्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत व्हावं, या निर्णयाचं मी स्वागत करते असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांची प्रतिक्रिया
तुतारी वाजवणारा माणूस यामध्ये माणूस हा शब्द महत्त्वाचा आहे. मध्यंतरी तुतारी हे चिन्ह निवडणुकीच्या माध्यमातून पुढं आलं. त्यामुळे अनेक लोकांचा घोटाळा झाला. त्यामुळे हजारो मत चुकीच्या ठिकाणी गेली. पण, सुदैवाने निवडणूक आयोगाने जे दुसरं चिन्ह होतं, त्याचं नाव तुतारी होतं ते काढून टाकलं आहे, आणि त्या ठिकाणी ट्रम्पेट हे नाव टाकलं आहे. आता तिथं तुतारी हा शब्द राहणार नाही. तुतारी वाजवणारा माणूस हा शब्द राहिलं. हे लक्षात ठेवा. हे सर्वापर्यंत पोहोचवा आणि मतांचा विक्रम होईल आणि आपल्या उमेदवारांना निवडून आणा असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
ट्रम्पेट चिन्हाचे तुतारी मराठी भाषांतर रद्द
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार ट्रम्पेट हे चिन्ह घेऊन लढले. या चिन्हाचे मराठीमध्ये भाषांतर तुतारी असं करण्यात आलेलं होतं. काही लोकसभा मतदारसंघात हजारोंच्या संख्येने या ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे असलेल्या उमेदवारांना मिळाली.