Sharad Pawar: थोपटेंची लोकसभेतील मदतीची परतफेड, संग्राम थोपटेंना थेट मंत्री करण्याचे शरद पवारांचे संकेत
Sharad Pawar: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळेंना मोठी मदत केल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.
पुणे: राज्यात निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावत आहेत. त्याआधी मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान भोरचे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्यासाठी शरद पवारांनी जाहीर सभा घेतली, यावेळी त्यांनी अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर थोपटेंच्या कामाचं कौतुक करत थेट मंत्री करण्याचे संकेत शरद पवारांनी (Sharad Pawar) दिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी सुप्रिया सुळेंना मोठी मदत केल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार बोलताना म्हणाले, उद्या आमच्या महाविकास आघाडीच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आल्यानंतर, जसं अनंतराव थोपटे यांना सरकार चालविण्यासाठी सहभागी होण्याची संधी मिळाली. तेच काम संग्राम यांच्याबद्दल होण्याबद्दल खबरदारी त्याठिकाणी घेतली जाईल, असं म्हणत शरद पवारांनी संग्राम थोपटे यांच्या मंत्री पदाचे संकेत दिले आहेत. भोर मतदारसंघाच्या विकासासाठी अहो रात्र कष्ट करणारा, तुमच्यामध्ये काम करणारा, तुमच्या तालुक्यामध्ये सहकार्य करणारा त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांना प्रत्येक विकासाच्या गोष्टीमध्ये साथ देणारा असाच कर्तुत्ववान प्रतिनिधी आपल्या समोर दिला आहे. आम्ही महाराष्ट्राचं चित्र बदलायचा पण आम्ही केला आहे.
गेल्या लोकसभेत आमचे केवळ सात खासदार होते, मात्र, या लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेने मोठा विश्वास दाखवला आणि आमचे एकतीस खासदार निवडून दिले. आता महाराष्ट्राची निवडणूक आहे. यावेळी अमुलाग्र बदल घडवायचा आहे, असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
भोर मतदारसंघ बारामती लोकसभेचा भाग आहे. या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व आहे. अनंतराव थोपटे आणि कुटुंबीयांनी भोर मतदारसंघामध्ये अनेक दशके काँग्रेस पक्षाचं नेतृत्व अबाधित ठेवलं आहे. या मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळेंना थोपटेंनी मोठी मदत केली होती, ते सुळेंच्या मागे भक्कमपणे उभे होते.
'सत्ता हातात असल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात'
भोरमध्ये येऊन काही लोक (अजित पवार) सांगतात, साखर कारखाना चालवता आला नाही म्हणतात, दोन दिवसांपूर्वी मी शिरूर विधानसभेत होतो, तिथे देखील ते असंच म्हणाले. साखर कारखाना कसा चालवतो हे मी बघतो, अरे तुम्ही उपमुख्यमंत्री झालात, सत्ता तुमच्या हातात आली, सत्ता हातात आल्यावर पाय जमिनीवर ठेवायचे असतात, डोकं शांत ठेवायचं असतं, संकटात असणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, उलट हे दमदाटी करत आहेत. ठीक आहे, सत्ता हातात आहे, त्याचा असा गैरवापर तुम्ही करत आहात. पण तुमच्या या भाषेला आणि दमदाटीला मतदार अजिबात भीक घालणार नाही. यांचा निकाल आपल्याला वीस तारखेला घ्यायचा आहे, असं म्हणत शरद पवारांनी (Sharad pawar) अजित पवारांना (Ajit Pawar) लक्ष्य केलं