(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मनसेची यादी पाहून भांडूपमधील कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीन सरकली; शिरीष सावंतांकडून संदीप जळगावकरांचा चोख 'कार्यक्रम'
भाडुंपमधून मनसेचे विभागप्रमुख संदीप जळगावकर हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षात आहेत. 2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील मनसे उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये त्यांच्या मतांची संख्या सर्वाधिक होती.
मुंबई : मनसेकडून (MNS) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत शिरीष सावंत यांचे नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भाडुंपमधून मनसेचे विभागप्रमुख संदीप जळगावकर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र मनसेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव नव्हतं. जळगावकरांचा पत्ता कापून सावंतांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निरीक्षक म्हणून आले आणि तिकिट घेऊन गेले असा काहीसा सूर कार्यकर्त्यांनी लावला होता.
मनसे (MNS) विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. त्याकरता मनसेने 225 विधानसभा मतदारसंघात पक्षाचे निरीक्षक नेमले होते. या निरीक्षकांना नेमून दिलेल्या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी करण्याची जबाबदारी होती. शिरीष सावंत यांच्यावक देखील भांडुपच्या मतदारसंघाची जबाबदारी होती. मात्र निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पडत असताना ते स्वत: देखील या मतदारसंघातून लढवण्यास इच्छुक होते. त्यामुळे मतदारसंघाचा अहवाल सादर करताना स्वत:चा आणि संदीप जळगावकर या दोघांचा अहवाल पक्षाला दिला होता.
जळगावकरांचे तिकिट कापल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
भाडुंपमधून मनसेचे विभागप्रमुख संदीप जळगावकर हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षात आहेत. 2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील मनसे उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये त्यांच्या मतांची संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ते उमेदवारीबद्दल प्रचंड आशावादी होते. मात्र असे असताना जळगावकर यांचे तिकीट कापून सावंत यांना तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले.
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी यादी खालीलप्रमाणे....#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/gmBAIzsfRb
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 22, 2024
उमेदवार बदलण्याची केली मागणी
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संदीप जळगावकर हे पदाधिकाऱ्यांसह 'कृष्णकुंज'वर गेले. त्यांनी शर्मिला ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली आणि उमेदवार बदलण्याची मागणी केली. मात्र एकदा उमेदवार जहीर झाल्यानंतर बदलता येणार नाही, असे नांदगावकर यांनी सांगितले. त्यानंतर आता भांडुपमधील मनसे पदाधिकारी वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची महिती समोर येत आहे.
हे ही वाचा :
MNS Candidate List : राज ठाकरेंचा धडाका सुरुच, मनसेची तिसरी यादी जाहीर, धनंजय मुंडेंविरोधात उमेदवार दिला, तिसऱ्या यादीत कुणाला संधी?