Supriya Sule: ईव्हीएम मशिनमध्ये गडबड, मला सतत एका व्यक्तीचा फोन येतोय; निवडणुकीपूर्वी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Supriya Sule: राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आलं आहे.
Supriya Sule: राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आलं आहे. सुप्रिया सुळेंना एक फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं, तर तो व्यक्ती ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याचं सागंतोय, याबाबतची माहिती आपण निवडणूक आयोगाला देणार असल्याचं सुळेंनी यावेळी सांगितलं आहे. त्याचबरोबर कोणत्याही पक्षाचा किंवा विरोधातील उमेदवाराची फसवणूक होऊ नये, असंही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यावेळी म्हणाल्या आहेत.
नेमकं काय म्हणाल्या सुळे?
माझ्याकडे एक फोन सातत्याने येतोय. तो माणूस मला काय काय सांगतोय. मी याची माहिती निवडणूक आयोगाकडे देणार आहे. कारण माझा या गोष्टीवर विश्वास नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराची फसवणूक होऊ नये एवढीच माझी मागणी. सत्तेत असो किंवा विरोधात पारदर्शक कारभार व्हावा, मी कोणावरतीही आरोप करत नाही. असे फोन येतात त्यावेळेस काळजी वाटते, सत्तेत असो किंवा विरोधात कोणत्याही उमेदवाराची फसवणूक होऊ नये. त्यामुळे याची माहिती मी निवडणूक आयोगाला देणार आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यावर सुळेंची प्रतिक्रिया
अजित पवारांनी (Ajit Pawar) 2019 मध्ये महाविकास आघाडी तयार होण्याआधी सत्ता स्थापनेसाठी भाजपबरोबरच्या चर्चेसाठी शरद पवारांसह उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी अमित शहा यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी युटर्न घेतला, त्याबाबत प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा प्रश्न तुम्ही अजित पवार यांना विचारा. मी आधीच म्हटले होते मला हे झालेला माहिती नाही. अजित पवारांनी (Ajit Pawar)स्टेटमेंट केलं त्यांनीच युटर्न घेतला. प्रश्न त्यांनाच विचारा माझा काय संबंध असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
ही वैचारिक लढाई आहे कुटुंबाची नाही
कटुता संपणार नाही हे अजित पवार (Ajit Pawar) यांचे मत आहे. लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. ही वैचारिक लढाई आहे कुटुंबाची नाही. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधातली ही लढाई आहे. मी माझ्या कुटुंबासाठी लढत नाही महाराष्ट्रासाठी लढते आहे. मायबाप जनतेसाठी लढते आहे. महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात लढते आहे. घरातला काय संबंध. आम्ही राजकारणात आमच्या घरासाठी नाही आलो. राजकारणात आम्ही राज्यातल्या या मायबाप जनतेसाठी आलो आहे, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यावेळी बोलताना म्हणाल्या आहेत.