Sunil Shelke: अजितदादांचे शिलेदार सुनील शेळकेंच्या अडचणी वाढल्या! शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
Sunil Shelke: मावळ पॅटर्नमुळं आधीच शेळकेंची डोकेदुखी वाढलेली आहे, अशातच त्यांच्यावर एक गुन्हा ही दाखल झाला आहे. त्यामुळं त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
पुणे: विधानसभा निवडणुकीची मोठी तयारी सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे शिलेदार सुनील शेळकेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. मावळ पॅटर्नमुळं आधीच शेळकेंची डोकेदुखी वाढलेली आहे, अशातच त्यांच्यावर एक गुन्हा ही दाखल झाला आहे. त्यामुळं त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत सुनील शेळकेंवर शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case filled Against Ajit Pawar Ncp Maval Candidate Mla Sunil Shelke)
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दहा वाजता प्रचार थांबवणं गरजेचं असताना ही सुनील शेळकेंनी आढले, खुर्द गावात रात्री 11 पर्यंत सभा सुरुचं ठेवली. सुनील शेळके इतक्यावर ही थांबले नाहीत तर पुढं चांदखेड गावात रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी शेळकेंच्या प्रचार रॅलीसमोर फटाके ही फोडण्यात आले. या दोन्ही बाबी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आहेत. त्यामुळं महायुतीतील सत्ताधारी आमदार सुनील शेळकेंनी कायदा हातात घेतल्याचं यातून दिसून आलं. आयोजक म्हणून नामदेव दाभाडे वर ही हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दहा वाजता प्रचार थांबवणं गरजेचं असताना ही सुनील शेळकेंनी आपला प्रचार सुरूच ठेवला. मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार, आमदार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ दाभाडे यांनी मंगळवारी (5 नोव्हेंबर) रोजी शिरगाव हद्दीतील आढले खुर्द व चांदखेड गावांमध्ये प्रचार करण्यात आला. त्यासाठी मावळ विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियम व अटीनुसार प्रचार फेरीला परवानगी दिली होती. परंतु, ही फेरी रात्री दहा वाजल्यानंतर काढण्यात आली. रात्री दहानंतर प्रचार करण्यास बंदी असताना देखील प्रचार फेरी काढण्यात आली. रात्री पावणेबारा वाजेपर्यंत सुनील शेळकेंची प्रचार फेरी सुरू होती. त्यामुळे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी निवडणूक विभागाचे कर्मचारी दीपक भाऊराव राक्षे (वय 53, रा. सोमाटणे फाटा) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (वय 45) यांच्यासह नामदेव सावळेराम दाभाडे (रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.