Maharashtra Election Result : मोठी बातमी! पहिल्या कलानंतर मुख्यमंत्रिपदावर शिंदे गटाचा दावा
Maharashtra Election Result : पहिल्या कलानंतर महायुतीने बहुमताचा आकडा गाठला असून हे कल असेच राहिले तर राज्यात महायुतीची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यातील सर्व 288 जागांचे कल हाती आले असून सत्तेसाठी मॅजिक फिगर असलेली संख्य महायुतीने गाठल्याचं दिसून आलं. महायुतीने 151 जागांवर आघाडी घेतली असून महाविकास आघाडी 125 जागांवर आघाडीवर आहे. असेच कल राहिल्यास महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे. त्यातच एक मोठी बातमी येत असून मुख्यमंत्रिपदावर शिंदे गटाने दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्रिपदावर शिंदे गट दावा करेल अशी प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली.
एबीपी माझाशी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे म्हणाले की, "या निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी मेहनत घेतली. सुरूवातीच्या कलामध्ये महायुतीला बहुमत मिळण्याचं दिसून येतंय. महायुतीने विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढली. त्याला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. महिला मतदारांनीही मोठा प्रतिसाद दिला आणि महायुतीला साथ दिल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्री शिंदेंचे कर्तृत्व आणि त्यांची लोकप्रियता कामाला आल्याचं दिसून आलं."
मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदेंचा दावा
राजू वाघमारे म्हणाले की, "महायुतीचं सरकार सत्तेत आलं पाहिजे असं ध्येय होतं. मुख्यमंत्री शिंदे हे सर्वसामान्यांचे नेते असून पहाटे पाच वाजेपर्यंत ते काम करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा महायुतीच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं पारडं हे अधिक जड असणार आहे. म्हणूनच मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे यांचा दावा पहिला असेल. पण महायुतीचे सर्व नेते एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेतील."
मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल, पुढील १० तासांत जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेचे वेगवान, अचूक निकाल तुम्हाला सकाळपासूनच एबीपी माझावर पाहता येणार आहेत... प्रत्येक मतदारसंघात कुणी मारली बाजी? कोण होणार तुमचा आमदार? कुणाची येणार सत्ता? काय घडामोडी घडणार? राष्ट्रपती राजवट लागणार का? कोण होणार किंगमेकर? या सर्व प्रश्नांची उत्तर, सविस्तर विश्लेषण.. तुम्हाला 'माझा'वर पाहता येणार आहे.
महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील.
एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि निकालाचे अपडेट पाहू शकता.




















