Maharashtra CM Oath Ceremony : मविआच्या बड्या नेत्यांची महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याकडे पाठ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार हजर
Maharashtra CM Oath Ceremony : महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडतोय. याकडे मविआच्या बड्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारनं प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडत आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मविआच्या बड्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र, शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला. मविआचे बडे नेते देखील शपथविधीला हजर राहणार नाहीत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारंसघाचे आमदार अभिजीत पाटील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत.
कोण आहेत अभिजीत पाटील?
अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचं काम करण्याचा निर्णय घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याऐवजी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचं काम करण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभेनंतर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात दाखल झाले आणि माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आमदार झाले. आज ते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला आझाद मैदानात दाखल झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. 2014 ते 2019 या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते. 2019 ला त्यांनी अजित पवार यांच्यासह सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी ते मुख्यमंत्री बनले होते, तेव्हा त्यांना 72 तासात राजीनामा द्यावा लागला होता. मविआ सरकारच्या काळात ते विरोधी पक्षनेते देखील होते. एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. आता महायुती सरकारचे ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आझाद मैदानात दाखल झाले आहेत.
इतर बातम्या :