एक्स्प्लोर
Advertisement
बिग फाईट्स : काही ठिकाणी तिरंगी लढत, तर अनेक ठिकाणी बंडोबांचं चॅलेंज
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा माहोल दिवसेंदिवस खूप जोर पकडत आहे. या निवडणुकीसाठी अनेक जागांवर सर्वच पक्षांमधील बंडखोर उमेदवारांचे आव्हान ही फार चर्चित बाजू आहे. राज्यातील काही महत्वाच्या बिग फाइट्स नेमक्या कशा आहेत? हे आपण जाणून घेऊ.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा माहोल दिवसेंदिवस खूप जोर पकडत आहे. या निवडणुकीसाठी अनेक जागांवर सर्वच पक्षांमधील बंडखोर उमेदवारांचे आव्हान ही फार चर्चित बाजू आहे. राज्यातील काही महत्वाच्या बिग फाइट्स नेमक्या कशा आहेत? हे आपण जाणून घेऊ.
पालघर-बोईसर विधानसभेत तिरंगी लढत
बोईसर विधानसभेत बंडखोरीमुळे महायुतीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. या मतदारसंघात तिघांमध्ये बिग फाईट पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून आयात उमेदवार शिवसेनेचे विलास तरे, महाआघाडीकडून बविआचे राजेश पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती समजले जाणारे भाजपचे बंडखोर उमेदवार संतोष जनाठे यांच्यात काटे की टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिघांचा प्रचार देखील आरोप प्रत्यारोपांनी गाजायला लागला आहे. त्यातच भाजपचे कार्यकर्ते संतोष जनाठे यांचा उघडपणे प्रचार करत आहेत. संतोष जनाठे यांच्या जोरदार प्रचारामुळे बोईसर विधानसभेवरील शिवसेनेचे वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपचा हा गनिमी कावा असल्याची चर्चा मतदार संघात रंगू लागली आहे, म्हणूनच बोईसरचा गड या निवडणुकीत कोण राखेल हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
रत्नागिरी मतदारसंघात निवडणूक रंगतदार
रत्नागिरी मतदारसंघात निवडणूक रंगतदार होणार हे चित्र पाहायला मिळणार आहे. म्हाडा अध्यक्ष आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार उदय सामंत हे उमेदवार आहेत. उदय सामंत यांना ही निवडणूक जरी एकतर्फी वाटत असली तरी राष्ट्रवादीकडून आपले आस्तित्व टिकवण्यासाठी सध्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात बंडखोर माजी आमदारांमुळे चुरस वाढली
तळकोकणातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात बिग फाईट पाहायला मिळत आहे. सावंतवाडीत भाजपचे बंडखोर माजी आमदार राजन तेली यांच्यामुळे चुरस वाढली आहे. शिवसेनेतर्फे पालकमंत्री दीपक केसरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सावंतवाडीचे मावळते नगराध्यक्ष बबन साळगांवकर हे मुख्य स्पर्धक असून येथे तिरंगी लढत आहे. मतदारसंघात एखादा उमेदवार दोन वेळा निवडून येतो तिसऱ्या वेळी पराभवाचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा इतिहास पुसून दीपक केसरकर नवा इतिहास घडवतात का याकडेही लक्ष लागून आहे.
भायखळा मतदारसंघात रंगतदार लढत
2014 च्या निवडणुकीत भायखळा मतदारसंघातील मतदारांनी सर्वांनाच धक्का दिला होता. तत्कालीन आमदार मधू चव्हाण यांना डावलत मतदारांनी वारिस पठाण यांच्या पारड्यात मतांचे दान टाकले आणि त्यांचा विजय झाला. हा निकाल राजकारण्यांनाच नव्हे, तर मुंबईकरांनाही अनपेक्षित होता. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एएमआयएमने विद्यमान आमदार वारिस पठाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे अरुण गवळींची कन्या आणि अ. भा. सेनेच्या नगरसेविका गीता गवळी या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. शिवसेनेने पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने पुन्हा मधू चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे
शिवडी विधानसभा मतदारसंघात मराठी विरुद्ध मराठी
शिवडी विधानसभा मतदारसंघात बिग फाईट आहे ती मराठी विरुद्ध मराठी. म्हणजेच मनसे विरुद्ध शिवसेनेत. शिवसेनेकडून अजय चौधरी तर मनसेकडून संतोष नलावडे विधानसभेच्या रिंगणात आहेत. मनसे नेते बाळा नांदगांवकर यांच्यानंतर शिवडीला मनसेकडून नवा चेहरा मिळाला आहे. मराठी मतं या भागात मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे मनसेसाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. तर मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत मनसेला हद्दपार करण्याचा शिवसेनेचा इरादा आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात जोरदार टक्कर
महाराष्ट्रात ज्या सर्वात रंगतदार लढती होत आहेत त्यातली एक म्हणजे कराड दक्षिणची. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपकडून अतुल भोसले, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार उदयसिंह उंडाळकर अशी तिरंगी लढत आहे. गेल्या पाच वर्षात अतुल भोसले यांना भाजपने मोठी ताकद दिली आहे. मागच्यावेळी 60,000 मतं उंडाळकर गटानं घेतली होती. यावेळी विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह यांनी बंडखोरी केली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी कराड दक्षिण वर लक्ष केंद्रीत केल्याने उत्सुकता वाढली आहे.
वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलार विरुद्ध आसिफ झकेरिया
वांद्रे पश्चिम विधानसभेत विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार आशिष शेलार आणि काँग्रेसचे नगरसेवक असलेले आसिफ झकेरिया यांच्या लढत होणार आहे. मात्र काँग्रेसचा गड असलेला हा मतदारसंघ 2014 नंतर पूर्णत: भाजपच्या हातात गेला. त्यानंतर आतापर्यंत काँग्रेसला आपल्या गडावरची पकड मजबूत करता आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसला एकेकाळी बालेकिल्ला असणारा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी मोठी फाईट द्यावी लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बातम्या
निवडणूक
निवडणूक
Advertisement