Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : धुळे ग्रामीणमध्ये भाजपचे राम भदाणे बनले आमदार, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कुणाल पाटलांचा पराभव
Dhule Rural Assembly Constituency : धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार राम भदाणे यांचा विजय झाला.
धुळे : विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Assembly Elections 2024) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून या निवडणुकीची रणधुमाळीला जोरदार सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेसकडून (Congress) विद्यमान आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर कुणाल पाटील यांच्या विरोधात महायुतीकडून (Mahayuti) भाजपने राम भदाणे यांना निवडणुकीच्या रिंगणात होते. या लढतीत राम भदाणे यांनी बाजी मारली.
धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांपैकी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा एकमेव मतदार संघ काँग्रेसकडे गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून कायम राहिला आहे. या ठिकाणी 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांचा कुणाल पाटील यांनी दणदणीत पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीपासून कुणाल पाटील यांनी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. त्यांचे वडील रोहिदास पाटील यांच्याकडून मिळालेला राजकीय वारसा कुणाल पाटील यांनी मोठ्या प्रयत्नाने जपला असून ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आजवर काँग्रेसचा कायम धबधबा राहिला आहे.
कुणाल पाटील यांच्या विजयाचा रथ रोखण्याचे होते आव्हान
2019 च्या निवडणुकीत काँग्रेसकडून कुणाल रोहिदास पाटील तर भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे या निवडणुकीच्या रिंगणात होते कुणाल पाटील यांना एक लाख 25 हजार 575 मते मिळाली होती तर भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांना एक लाख 11 हजार अकरा मते मिळाली होती. 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीत धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेसला सुटली आहे. तर महायुतीकडून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा भाजपला जाणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील यंदा दावा केला जात आहे. महाविकास आघाडी कडील धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ स्पष्ट झाले असताना कुणाल पाटील यांच्या विजयाचा रथ रोखण्याचे आव्हान यंदा महायुतीला असणार आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपला मिळालेला पराभव लक्षात घेता यंदा कोणत्या उमेदवाराला संधी मिळते? याची उत्सुकता आता वाढू लागली आहे.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांची मते निर्णायक
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वाधिक असून या ठिकाणी शेतकऱ्यांचा पिक विमा अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे होणारे नुकसान तसेच सिंचनाचे प्रश्न हे कायम असून यामुळे शेतकऱ्यांची मते धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात निर्णायक ठरत असतात. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या बाजूने दिलेला कौल लक्षात घेता 2024 च्या निवडणुकीत महायुतीला शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाय योजना राबवाव्या लागणार आहेत. कुणाल पाटील यांचे मतदारसंघावर असणारे वर्चस्व लक्षात घेता महायुती कोणता अजेंडा घेऊन शेतकऱ्यांसमोर जाणार आहे हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे असणार आहे. राज्यात झालेली सत्ता परिवर्तन तसेच अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे पिकांचे झालेले नुकसान पीक विम्याचा प्रश्न आणि सिंचनाचा प्रश्न यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले आहेत का? आणि त्यातून महायुतीच्या बाजूने बळीराजा 2024 च्या निवडणुकीत कौल देतात का? हे पाहणे महत्त्वाचे होते. मात्र जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे.
आणखी वाचा