Maharashtra Election Result: मुख्यमंत्री शिंदेंना आमदार फुटण्याची भिती? विधानसभेतील घवघवीत यशानंतही पक्षानं घेतला 'हा' मोठा निर्णय
Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं धमाकेदार कामगिरी केली. शिवसेनेनं आतापर्यंत 54 विधानसभेच्या जागा जिंकल्या असून 3 जागांवर आघाडीवर आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal) जाहीर झाले आहेत. यंदाच्या निकालात महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. यंदाची खरी लढाई होती, शिवसेनेच्या (Shiv Sena) अस्तित्वाची, खरी शिवसेना कुणाची? या प्रश्नांची उत्तरं राज्याला मिळाली. या निवडणुकीत मतदारराजानं शिंदेंच्या बाजूनं कौल दिल्याचं पाहायला मिळालं. निकाल लागला, महायुतीला घवघवीत यश मिळालं, शिंदेंच्या पदरातही मतदार राजानं मतांचं दानही टाकलं. पण, निवडणुकांमधील दणदणीत यशानंतरही एकनाथ शिंदे यांना एक चिंता सतावते, ती म्हणजे, आमदार फुटण्याची. आणि याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील शिवसेनेचे सर्वच्या सर्व आमदार वांद्रे येथील ताज लँड्स एंड (Taj Lands End) हॉटेलमध्ये राहणार आहेत. शपथविधीपर्यंत सर्वांना हॉटेलमध्येच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे पक्षनेते निवडण्याची प्रक्रियाही हॉटेलमध्येच होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं धमाकेदार कामगिरी केली. शिवसेनेनं आतापर्यंत 54 विधानसभेच्या जागा जिंकल्या असून 3 जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (23 नोव्हेंबर) ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात 1.2 लाख मतांनी विजय मिळवला.
एकनाथ शिंदेंची केदार दीघेंवर मात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाण्यात प्रभाव आहे. ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे एकूण 1 लाख 59 हजार 60 मतं मिळाली, जी टक्केवारीमध्ये पाहिली तर तब्बल 78.4 टक्के होतात. निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा सामना ठाकरे गटाचे उमेदवार आणि आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांच्यासोबत होता. केदार दिघे यांना 38 हजार 343 मतं मिळाली.
2019 मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय घाडीगांवकर यांचा 89 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये तत्कालीन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारलं आणि तब्बल 40 आमदार घेऊन थेट गुवाहाटी गाठलं. यानंतर शिंदे यांचं बंड उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. काय घडलं? कसं घडलं? हे उभा महाराष्ट्र याची देही, याची डोळा पाहत होता. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. एक-एक करुन मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक सर्वच्या सर्व आमदार शिंदेंकडे गेले, तर काही मोजकेच ठाकरेंकडे उरले. शिंदे एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी थेट पक्षावर दावा केला. त्यानंतर पक्षाचं पक्ष चिन्हा धनुष्यबाणावर. यावरुनच न्यायालयीन लढाई सुरू झाली. पण, शिंदेंनी पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही आपल्याकडे घेतलं.
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांनी तब्बल 81 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पक्षानं 57 जागांवर शानदार विजय मिळवला. तसेच, शिंदेंचे मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून उत्तम कामगिरी केली. आता राज्यातील सत्तेच्या चाव्या महायुतीच्या ताब्यात असणार आहेत.