Uddhav Thackeray : 2014, 2019 ला माझा शिवसैनिक हारुन खान नरेंद्र मोदींसाठी मतं मागत होता, उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांना दाखला
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये कैलास पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली.
धाराशिव : उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये सभा घेतली. ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचा अभिमान आहे, असं त्यांनी म्हटलं. कैलास पाटील यांना घेऊन चालले होते पण तो माझ्या संपर्कात होता. कैलास कसा आला, का आला ते त्यानं सांगितलेलं आहे. निष्ठा कधी विकली जाऊ शकत नाही, निष्ठा कोण विकत घेऊ शकत नाही,असं ठाकरेंनी म्हटलं. मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हारुन खान यांच्या उमेदवारीवरुन भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेला ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.
भाजपचा मला संपवायचा प्रयत्न आज देखील सुरु आहे. तुम्ही सोबत आहात तोपर्यंत माझं अस्तित्व आहे. मोदी शाह मला संपवू शकत नाहीत. माझं संरक्षण कवच आई जगदेंबनं तुमच्या रुपात दिलेलं आहे. आपण आपला वचननामा दिलेला आहे, मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. महायुतीचा जुमलानामा प्रसिद्ध झालाय. महिलांना 1500 रुपये देत आहेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणतात. पण हे कधी तुम्ही लोकसभेला पेकाटात लाथ घातली तेव्हा केलं. माझं सरकार पाडलं तेव्हा का केलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझं सरकार आलं तेव्हा सात जण मंत्री होतो, अजित पवार मंत्रिमंडळात नव्हते, त्यावेळी आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नरेंद्र मोदी म्हणाले होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु पण किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सोयाबीन शेतकऱ्यांना आमच्या सरकारच्या काळात जास्त भाव मिळत होता. गद्दारांना 50 खोके देताना लाज वाटत नाही पण राबराबणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोन्याची किंमत मातीमोल करता, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. आपलं सरकार आल्यानंतर तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची कर्जमाफी करणार आहोत. शेतमालाला हमीभाव देणार आहोत, असं ठाकरेंनी म्हटलं.
तेव्हा तुम्हाला धर्मयुद्ध का आठवलं नाही : उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काल वर्सोवा आणि अंधेरीत सभा घेतली.वर्सोवा मतदारसंघात हारुन खान या शिवसैनिकाला उमेदवारी दिलीय. 25-30 वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करतोय. त्याच्या पत्नी नगरसेवक होत्या. त्याला पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस तिकडे गेले आणि धर्मयुद्ध करा म्हणाले. देवेंद्र फडणवीस विसरले असतील, 2014 आणि 2019 ला आम्ही तुमच्यासोबत होतो, मोदींसाठी मत मागत होतो तेव्हा माझा शिवसैनिक नरेंद्र मोदींसाठी मत मागत होता तेव्हा तुम्हाला धर्मयुद्ध का दिसलं नाही,असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
इतर बातम्या :
अंतरवाली सराटीत लाठीचार्ज कुणाच्या आदेशानं झाला? आया बहिणींची डोकी कुणी फोडली?, कैलास पाटलांचा सवाल