मोठी बातमी! बोरिवलीतून गोपाळ शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज मागे, विनोद तावडेंच्या शिष्टाईला यश
विनोद तावडेंच्या शिष्टाईला यश आले आहे. बोरिवलीतून गोपाळ शेट्टी, अंधेरीतून स्विकृती शर्मा यांनी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेता आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत अनेक मतदारसंघात बंडखोरी झालीय. राजकीय पक्षांकडून बंडखोरांची मनधरणी, अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत गोपाळ शेट्टी आणि स्वीकृती शर्मा अर्ज मागे घेतात का याची उत्सुकता होती. अखेर विनोद तावडेंच्या शिष्टाईला यश आले आहे. बोरिवलीतून गोपाळ शेट्टी, अंधेरीतून स्विकृती शर्मा यांनी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेता आहे.
भाजपकडून बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न होताना दिसताय. मुंबईतल्या बोरिवलीतून गोपाळ शेट्टींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना माघार घेण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात होते. मात्र गोपाळ शेट्टी निवडणूक लढण्यावर ठाम होते. काल फडणवीसांनींही त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आज विनोद तावडे गोपाळ शेट्टींच्या भेटीसाठी दाखल झाले. अखेर तावडेंच्या शिष्टाईला यश आले आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने गोपाळ शेट्टी काय निर्णय गेणार याकडे लक्ष लागले होते.
काय म्हणाले गोपाळ शेट्टी?
गोपाळ शेट्टी म्हणाले, होय मी माघार घेत आहे. मी आमदार बनण्यासाठी लढत नाही आहे. मला दुसऱ्या पक्षांकडून देखील आॅफर होत्या . मात्र मला तसं करायचं नव्हतं . माझी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीसाठी होती. गोपाळ शेट्टी करतोय तर करु दे काय फरक करतो असं आमच्या पक्षात नाही . सर्व पक्षश्रेष्ठी मला भेटायला आले. माझं मत श्रेष्ठींपर्यंत बरोबर पोहोचले. बाहेरचा उमेदवार आणू नये असं मी मुळीच म्हणत नाही आहे . मात्र सातत्याने झाल्याने मला हे करावं लागलं. पक्ष व्यक्तीपेक्षा मोठा असतो . पक्षाकडे आपल्या भावना मांडल्या आहेत . पक्षाला समजायला वेळ लागणार नाही असं नाही . लोकांना काय वाटेल मला माहिती नाही . पक्षाच्या नेत्यांवर नाराज नाही पण काही नेते आहेत ते असं करत असतात. नकळत होत असेल पण त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे. प्रत्येकवेळी निर्णय घेणारा माणूस एकच नसतो . मी अशा कार्यकर्त्यांचं नेतृत्व करतो जे पक्षश्रेष्ठींचं ऐकतात . मी पक्ष नेतृत्वाचं ऐकतो तर ते देखील ऐकतील
मी अन्य पक्षात जाणार नाही, हे मी सांगितले होते. माझी लढाई एका विशिष्ट कार्यपद्धतीविरोधात आहे. भाजप पक्ष कार्यकर्त्यांची खूप काळजी घेतो. मला आनंद आहे की, माझ्या पक्षातील नेत्यांनी संवाद साधला. त्यामुळे मी आता माघार घेतो. माझा मुद्दा पक्षश्रेष्ठींकडे पोहोचला आहे. सातत्याने बोरिवलीत अन्याय होतो, अशी चर्चा होती.
रविवारी रात्री काय घडले?
गोपाळ शेट्टी यांनी रविवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून फडणवीसांसह भाजपचे नेते गोपाळ शेट्टी यांची समजूत काढत होते. विनोद तावडे आणि आणि आशिष शेलार शेट्टी यांची समजूत काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस यांनी, 'गोपाळ शेट्टी हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, ते पक्षाची लाईन सोडणार नाहीत', असा विश्वास व्यक्त केला होता. गोपाळ शेट्टी यांनी माघार घेतल्याने फडणवीसांचा हा विश्वास सार्थ ठरला आहे.