Arni Assembly Election 2024 : अर्णीत भाजप अन् काँग्रेस पुन्हा आमने सामने, राजू तोडसाम- जितेंद्र मोघे रिंगणात, विष्णू उकंडे रिंगणात असल्यानं ट्विस्ट
Arni Assembly Election 2024 : यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. याठिकाणी भाजपचे राजू तोडसाम आणि काँग्रेसचे जितेंद्र मोघे रिंगणात आहेत.
Arni Assembly Election 2024 यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. यवतमाळ, राळेगाव, वणी, अर्णी, दिग्रस, उमरखेड आणि पुसद या मतदारसंघांपैकी काही मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. अर्णी विधानसभा मतदारसंघ देखील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. एकेकाळी काँग्रेसच्या बाजूनं असलेला हा मतदारसंघ गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. आता या मतदारसंघात पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेस आमने सामने आले आहेत. भाजपनं राजू तोडसाम यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसकडून शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र मोघे विधानसभेच्या रिंगणात आहेत.
राजू तोडसाम आणि जितेंद्र मोघे यांच्यात लढत
अर्णी मतदार संघ हा नेहमीच काँग्रेसच्या बाजूने राहिला आहे. मात्र, 2014 पासून येथे भाजपने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे. भाजपनं अर्णी मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचं तिकीट कापून राजू तोडसाम यांना उमेदवारी दिली. 2014 ते 2019 या काळात राजू तोडसाम हे भाजपकडूनच आमदार होते. मात्र 2019 मध्ये त्यांची तिकीट कापण्यात आलं होतं. आता ते पुन्हा भाजपकडून लढत आहेत. तर, काँग्रेसच्या चिन्हावर जितेंद्र मोघे रिंगणात आहेत.
विष्णू उकंडे काय करणार?
भाजपने पुन्हा राजू तोडसाम यांना 2024 च्या निवडणुकीत संधी दिली आहे. तर, महायुतीत असलेले शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उपजिल्हाप्रमुख विष्णू उकुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. आदिवासी बहूल भाग असलेल्या या आर्णी मतदार संघात आता कोण बाजी मारणार कारण तिन्ही उमेदवार हे मागील दहा वर्षांपासून या मतदार संघात कामाला लागले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार उकंडे हे आपला अर्ज मागे घेणार की निवडणुकीच्या रिंगणात राहणार हे लवकरच कळणार आहे. मात्र त्यांच्या अर्जाने महायुतीचे गणित बिघडणार आहे.
लोकसभेला काय घडलं?
अर्णी विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येतो. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्या बाजूनं या मतदारसंघातील मतदारांनी कौल दिला. प्रतिभा धानोरकर आघाडीवर होत्या तर, सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर राहिले होते. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 114085 मतं मिळाली. तर, भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना 94521 मतं मिळाली होती.
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या संदीप धुर्वे यांना निसटता विजय मिळाला होता. त्यामुळं यंदाची अर्णी विधानसभा मतदारसंघातील लढत अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :