Loksabha Election 2024 : देशात अठराव्या लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. देशभरात 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 4 जूनला देशात मतमोजणी प्रक्रिया पार पडेल, त्याच दिवशी निवडणुकांचे निकाल हाती येतील. त्यामुळे आता आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे आधी पाहून घ्या, अन्यथा ऐनवेळी मतदार यादीत नाव नसल्याने तुम्हाला मतदान करता येणार नाही.


महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये म्हणजेच - 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांच्या वेळी मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. मतदारांनी दिलेल्या मतांवर नेते निवडून येतात. निवडणुका जाहीर झाल्या की मतदार यादी देखील जाहीर होते आणि ही मतदार यादी दरवेळी बदलत असते. त्यामुळे प्रत्येकाने मतदानापूर्वी मतदार यादीत तुमचं नाव आहे का हे तपासलं पाहिजे.


मतदार यादी 2024 मध्ये स्वत:चं नाव का तपासावं?


आता तुम्हाला वाटेल की मागच्या वेळी तर मतदार यादीत आमचं नाव होतं, मग आता पुन्हा चेक करण्याची काय गरज? तर तुमच्या माहितीसाठी - मतदार याद्या या दरवेळी अपडेट होत असतात, दरवेळी यादीत काही बदल होत असतात. काही वेळा मतदार यादीतील तुमचं नाव चुकू शकतं किंवा तुमच्या पत्त्यात काही बदल झालेला असू शकतो.


काही वेळा चुकीने तुमचं नाव वगळलं जाऊ शकतं, त्यामुळे या सर्वाची खबरदारी म्हणून तुम्ही मतदार यादीत तुमचं नाव चेक केलं पाहिजे, अन्यथा ऐन वेळी तुम्हाला मतदान करता येणार नाही. मतदार यादीतील तुमच्या तपशीलात काही दुरुस्ती असल्यास तुम्ही त्या निवडणुकाच्या 10 दिवस आधीपर्यंत बदलून घेऊ शकता.


मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल?


1. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत तुमचं नाव शोधू शकता. त्यासाठी सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या या लिंकवर क्लिक करा - https://voters.eci.gov.in/


2. वेबसाईटच्या मुखपृष्ठावरील 'Search in Electoral Roll' टॅबवर क्लिक करा.




3. आता वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 पर्याय दिसतील. 'Search by Details', 'Search by EPIC', 'Search by Mobile' या पैकी एका पर्यायावर क्लिक करा.




4. आवश्यक माहिती (Basic Information) आणि कॅप्चा कोड सबमिट करा, यानंतर 'Search' वर क्लिक करा.


5. यानंतर आता खाली मतदार यादीतील तुमचं नाव, EPIC Number आणि सर्व माहिती दिसेल.




6. जर सर्च केल्यानंतरही तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेले तपशील एकदा तपासून पाहावे किंवा तीनपैकी इतर दोन पर्यायाचा वापर करावा. तरीही नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.


SMS द्वारे मतदार यादीतील नाव तपासा


एसएमएसद्वारे मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वात प्रथम मेसेज टाईप करताना स्पेस दाबा. त्यानंतर तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक टाईप करा. हा एसएमएस 9211728082 किंवा 1950 वर पाठवा. याचं उत्तर तुम्हाला एसएमएसमध्ये मिळेल. तसेच एसएमएसमध्ये भाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक आणि नाव पाठवलं जाईल. तुमचे नाव मतदार यादीत नसल्यास, ‘नो रेकॉर्ड फाऊंड’ असा मेसेज येईल.


हेही वाचा:


Loksabha Election : लोकसभेसाठी 97 कोटी मतदार, 2 कोटी नवमतदार अन् 85 वर्षावरील वृद्ध घरातून मतदान करणार!