एक्स्प्लोर
Advertisement
शाहांविरोधात आंदोलन न करायला ते देव आहेत का? : ममता बॅनर्जी
भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान कोलकात्यात मोठा राडा झाला. तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषद आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात तुफान दगडफेक आणि जाळपोळ झाली. या राड्यामुळे अमित शाहांना आपला रोड शो अर्धवट सोडावा लागला.
कोलकाता : अमित शाहांविरोधात आंदोलन न करायला ते देव आहेत का? अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. कोलकातामध्ये अमित शाहांच्या रोड शोमधील राड्यानंतर, ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी या राड्यावर प्रतिक्रिया दिली.
कोलकातामध्ये तुफान राडा
भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शोमध्ये तुफान राडा झाला. तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषद आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्यामुळे काही काळासाठी वातावरण तंग झालं होतं. कोलकात्यातील धर्मतल्ला भागातील शहीद मिनार मैदानातून अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात झाली. मेडिकल कॉलेजजवळ हा रोड शो आल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी 'गो बॅक'चा नारा दिल्याने भाजप कार्यकर्ते चिथावले. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकही झाली. यानंतर रोड शो आवरता घेत अमित शाह यांना सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे ते सुखरुप आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी लाठीचार्ज करुन कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवलं.
शाह देव आहेत का? : ममता बॅनर्जी
विद्यासागर कॉलेजचा दौरा केल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "अमित शाह स्वत:ला काय समजतात? ते सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत का? त्यांच्याविरोधात आंदोलन न करायला ते काय देव आहेत का? आंदोलक एवढे असभ्य आहेत की, त्यांनी समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळाही तोडला. आंदोलन करणारे सगळे बाहेरचे लोक आहेत. मतदानाच्या दिवसासाठी भाजपने त्यांना आणलं आहे.
तर "भगव्या पक्षाला बंगालच्या संस्कृतीचा कोणताही सन्मान नाही, हे त्यांच्या समर्थकांनी दाखवून दिलं," असं टीएमसीचे सरचिटणीस आणि राज्याचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी म्हणाले.
अमित शाहांच्या कोलकात्यातील रोड शोमध्ये तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांचा राडा
अमित शाह गुंड : ममता बॅनर्जी
या संपूर्ण राड्यावर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी यांनी अमित शाहांचा उल्लेख 'गुंड' असा केला. "जर रोड शोमध्ये तुमचे हात विद्यासागर यांच्यापर्यंत पोहोचतात तर मी तुम्हाला गुंडाशिवाय आणखी काय बोलणार? मला तुमच्या विचारधारेची घृणा आहे, तुमच्या पद्धतीचा तिरस्कार आहे," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. सोबतच ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडल्याच्या विरोधात गुरुवारी एक रॅली काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
प्राचार्यांचा आरोप
विद्यासागर कॉलेजचे प्राचार्य गौतम कुंडू यांच्या माहितीनुसार, "भाजप समर्थक पक्षाचा झेंडा घेऊन कार्यालयात घुसले आणि आमच्यासोबत गैरवर्तन केलं. त्यांनी कागदपत्रं फाडली, कार्यालय आणि खोल्यांची तोडफोड केली. जाताना ईश्वरचंद्र विद्यासागर यांची पुतळाही तोडला. त्यांनी दरवाजे बंद केले आणि मोटारसायकली आगीच्या भक्ष्यस्थानी केल्या. भाजप कार्यकर्त्यांनी काही विद्यार्थ्यांना जखमी केलं."
टीएमसीच्या गुंडांचा माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न : अमित शाह
"टीएमसीच्या गुंडांनी माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. ममता बॅनर्जी यांनी हिंसा भडकावण्याचा प्रयत्न केला. पण मी सुरक्षित आहे. राड्याच्या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. स्वामी विवेकानंद यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मला त्यांच्या बिधान सारणी इथल्या मूळ निवासस्थानी जायचं होतं. पण मला तिथे जाऊ दिलं नाही. याचं मला अतिशय दु:ख आहे," असा आरोप अमित शाह यांनी केला.
ममता बॅनर्जींच्या प्रचारावर बंदी घाला : भाजपची मागणी
दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने काल (14 मे) रात्री उशिरा दिल्लीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर मुख्तार अब्बास नकवी यांनी पत्रकारांना सांगितलं की, "दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी. तसंच सीआरपीएफने निवडणूक क्षेत्रात फ्लॅगमार्च करावा आणि मुख्यमंत्र्यांवर प्रचारबंदी करावी, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
बीड
बीड
Advertisement