भाजपला लोकसभेच्या 105 जागांवर हरवणे विरोधकांना जवळपास अशक्य, विश्वास बसत नसेल आकडे पाहा
Lok Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक जोमाने तयारीला लागले आहेत.
Lok Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक जोमाने तयारीला लागले आहेत. त्याचं कारण, सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकी होय. कर्नाटक जिंकल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय. त्यांच्याच नेतृत्वात 26 विरोधीपक्षांची बैठक बंगळुरुमध्ये पार पडली. त्याचवेळी दिल्लीत सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वात एनडीएच्या 38 पक्षांची बैठक पार पडली. दोन्ही बैठकीनंतर दोन्ही बाजूनं एकमेकांवर टीका झाली. मात्र, टीकेच्या केंद्रस्थानी आला इंडिया... विरोधकांनी आपल्या आघाडीचं नाव इंडिया ठेवले, आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया अशी लढत पाहायला मिळणार आहे. पण विरोधकांना मोदींचा पराभव करण वाटते तितक सोपं नाही.
2019 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीमधील खास आकडेवारी समोर आली. हा आकडा विरोधी पक्षाला धडकी भरवणारा आहे. जवळपास १०५ जागा अशा आहेत, त्या ठिकाणी भाजपला पराभूत करणं शक्य नाही. विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया'साठी हा आकडा मोठे आव्हान म्हणता येईल. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हे आकडे कितपत प्रभावी ठरतील यावर काहीही सांगणे घाईचे आहे. असे असले तरी या आकडेवारीवरून भाजपची ताकद किती आहे याचा अंदाज लावता येतो.
2019 मध्ये तीन लाख मतांनी भाजपने 105 जागांवर विजय मिळवला
द प्रिंटच्या वृत्तानुसार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने तीन लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने 105 जागा जिंकल्या. भाजपचा हा विजय 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्याच मतांच्या फरकाने मिळविलेल्या जागांपेक्षा 63 जागा जास्त आहेत.
दोन लाख मतांच्या फरकाने विजयी झालेल्या 236 पैकी 164 खासदार भाजपचे -
2019 च्या लोकसभा निवडणुकीत दोन लाख मतांच्या फरकाने विजयी झालेल्या 236 खासदारांपैकी 164 खासदार भाजपचे होते. त्याच वेळी, तीन लाख मतांच्या फरकाने विजयी झालेल्या 131 खासदारांपैकी 105 भाजपचे होते. उर्वरित 26 खासदारांपैकी 10 द्रमुकचे आणि पाच काँग्रेसचे होते. भाजपच्या उमेदवारांनी 4 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने 44 जागा जिंकल्या. एवढेच नाही तर पक्षाचे 15 खासदारांनी 5 लाखांहून अधिक मतांनी विजयी मिळवला.
लोकशाहीमध्ये विजय-पराभवावर कोणाचेही नियंत्रण नसते, परंतु ही आकडेवारी पाहता या जागांवर भाजपला टक्कर देणे विरोधी आघाडी 'इंडिया'साठी सोपे जाणार नाही, असे म्हणता येईल. या सर्व जागांवर विरोधकांना भाजपकडून कडवे आव्हान मिळणार आहे. लोकसभेच्या या 105 जागांवर भाजपला पराभूत करणे विरोधकांना अशक्यप्राय वाटते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.