ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान कधी होऊ शकते?; एवढे उमेदवार असल्यास घेतला जातो निर्णय
Lok Sabha Election 2024 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी प्रत्येक मतदारसंघात 400 हून अधिक उमेदवार देण्याची घोषणा केली आहे.
Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने (Election Commission) लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Lok Sabha Election Dates) जाहीर केल्या आहेत. मात्र, एखाद्या मतदारसंघात शेकडो उमेदवार रिंगणात असल्यास ईव्हीएमऐवजी (EVM) बॅलेट पेपरवर (Ballot Paper) मतदान केले जाण्याची चर्चा होती. दरम्यान, आता यावर खुद्द निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे. एखाद्या मतदारसंघात 400 हून अधिक उमेदवार आल्यास तेथे ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर म्हणजेच मतदानपत्रिकेवर मतदान घेतले जाईल अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी प्रत्येक मतदारसंघात 400 हून अधिक उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. यासाठी गावागावातून उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी बैठका देखील घेतल्या जात आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात देखील मराठा उमेदवार उभे करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून केवळ 400 च उमेदवारांचे मतदान घेता येत असल्याने त्याहून अधिक उमेदवार आल्यास काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर चोकलिंगम म्हणाले की, अशी परिस्थिती आल्यास एक बुकलेटच तयार केले जाईल. बुकलेट मतपत्रिकेच्या माध्यमातून 400 पेक्षा अधिक उमेदवारांच्या नावांचा आणि चिन्हाच्या आधारावर मतदारांकडून शिक्का मारून मतदान केले जाऊ शकते. त्यासाठी आयोग सज्ज असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.
चोकलिंगम म्हणाले आहेत.
झालेली वाढ विचारात घेऊन सहाय्यकारी मतदान केंद्रे तयार करण्यात येतात
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1500 इतकी कमाल मतदार संख्या निर्धारित करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकांच्या पूर्वी मतदारांच्या संख्येत झालेली वाढ विचारात घेऊन सहाय्यकारी मतदान केंद्रे तयार करण्यात येतात. आजमितीस भारत निवडणूक आयोगाकडे 778 सहाय्यकारी मतदान केंद्रांचे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर ही अतिरिक्त सहाय्यकारी मतदान केंद्रे स्थापित करण्यात येतील. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या 98,100 वर जाण्याची शक्यता असल्याचे चोकलिंगम म्हणाले.
आचारसंहिता जाहीर, आता 'या' बाबींवर निर्बंध लागू
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे संपूर्ण राज्यात आजपासून तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. सदर आचार संहिता लोकसभेचे नवीन सभागृह गठित होण्याबाबतची संविधानिक अधिसूचना जारी होईपर्यंत लागू राहील. त्यामुळे उपरोक्त कालावधीत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, शासकीय सार्वजनिक, खासगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादीं बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :