Lok Sabha election 2024: अखिलेश यादव यांचे आरोप खरे ठरले, निवडणूक आयोगाकडून चूक मान्य, राजीव कुमार म्हणाले, आम्हाला पहिल्यांदा धडा मिळाला...
Lok Sabha election 2024: लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केलेले आरोप खरे ठरले आहेत. निवडणूक आयोगानं देखील त्यांची चूक मान्य केली आहे.
CEC Rajeev Kumar Press Conference नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Election) मतदान सात टप्प्यात पार पडल्यानंतर मतमोजणीच्या एक दिवस अगोदर केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. यंदाच्या निवडणुकीत मतदार आणि राजकीय नेत्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 7 मे 2024 ला सैफईमध्ये झालेल्या मतदानावेळी आरोप केले होते. भाजपवाले मुद्दा उन्हाच्या तडाख्यात मतदान करायला लावतात. कडक उन्हात जे मतदान होत आहे ते एक महिन्यापूर्वी देखील झालं असतं, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं.
मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अखिलेश यादव यांनी उठवलेल्या मुद्यांवर भाष्य केलं. निवडणूक एक महिन्यापूर्वी संपवायला हवी होती, एवढ्या कडक उन्हात मतदान घ्यायला नको होतं, हा आम्हाला मिळालेला पहिला धडा आहे, असं राजीव कुमार म्हणाले.
राजीव कुमार यांनी पुढं म्हटलं की, आम्ही 642 मिलियन मतदानाचा जागतिक विक्रम केला आहे. हा जी-7 देशांच्या मतदारांच्या दीड पट आहे. यूरोपियन यूनियनच्या 27 देशांच्या अडीच पट मतदान भारतात झालं, असं राजीव कुमार म्हणाले.
निवडणूक कर्मचाऱ्यांनी सावधानता बाळगल्यानं कमी ठिकाणी फेरमतदान घ्यावं लागलं. आम्ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 39 ठिकाणी फेरमतदान घेतलं. तर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 540 ठिकाणी फेरतमतदान घ्यावं लागलं होतं. यावेळी 39 पैकी 25 फेरमतदान केवळ 2 राज्यात झालं, असं राजीव कुमार यांनी म्हटलं.
राजीव कुमार मतदान प्रक्रियेबाबत काय म्हणाले?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार उद्या म्हणजेच 4 जून रोजी होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली. काही राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर होणारी हिंसा रोखण्यासाठी निमलष्करी दलं तैनात केली, असल्याचं देखील राजीव कुमार यांनी सांगितलं.
दरम्यान, देशातील लोकसभेच्या 543 मतदारसंघांसाठी मतमोजणी होणार आहे. याशिवाय ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. देशात कुणाची सत्ता येणार याशिवाय आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये कुणाची सत्ता येणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी: उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश
मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी, 72 तास जोरदार पावसाचा IMD चा अंदाज