पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, प्रतापराव जाधवांचा प्रवास
Khasdar Prataprao Jadhav : बुलढाण्यातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे.
Shiv Sena Khasdar Prataprao Jadhav Profile : बुलढाण्यातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे. 1997 नंतर तब्बल 22 वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रातील मंत्रिपद मिळालेय. त्यांना कोणतं मंत्रिपद मिळालं, हे अद्याप समोर आलेले नाही. पण आज रात्री ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर प्रतापराव जाधव एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे होते. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली. 1990 पासून ते राजकारणात सक्रीय आहेत. पंचायत समिती सदस्य, आमदार, राज्यात क्रीडा मंत्री, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा प्रतापराव जाधवांचा प्रवास राहिलाय. त्यांनी अनेक संसदीय समितीत सदस्य म्हणून काम पाहिलेय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भात एकमेव जागा मिळवत बुलढाण्याचा गड प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी राखला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दोन शिवसैनिकांच्या लढतीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) आणि शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा पराभव करत प्रतापराव जाधव यांनी विजय मिळवलाय. या विजयाचं बक्षीस प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाच्या रुपाने मिळाले आहे.
कुटुंबात कोण कोण ?
25 नोव्हेंर 1960 रोजी प्रतापराव जाधव यांचा मेहकर येथे जन्म झाला. सुरुवातीपासून त्यांना राजकारण आणि समाजकारणात रुची होती. प्रतापराव जाधव यांचा विवाह 1 एप्रिल 1983 रोजी राजश्री यांच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
व्यवसाय - अडत दुकान आणि शेती.
प्रतापराव जाधवांचं शिक्षण -
बुलढाणा, चिखलीतील शिवाजी कॉलेज येथे त्यांचं शिक्षण झालं. त्यांचं शिक्षण बीए दुसऱ्या वर्षांपर्यंतच झालेले आहे.
प्रतापराव जाधवांचा अल्प राजकीय परिचय -
1990-1995 - सभापती, मेहकर तालुका खरेदी विक्री समिती मेहकर
1992-95 - पंचायत समिती सदस्य
1992-1996 - सभावती मेहकर तालुका, उपज मंडी, मेहकर जिल्हा बुलढाणा
1995-2015 - संचालक, जिल्हा कॉपरेटिव्ह बँक बुलढाणा
2010-2015 - उपाध्यक्ष, जिल्हा कॉपरेटिव्ह बँक, बुलढाणा
1995-2009 - सदस्य महाराष्ट्र विधानसभा (तीन वेळा, 15 वर्ष)
1997-1999 - क्रीडा मंत्री, युवा कल्याण आणि सिंचन राज्य मंत्री, महाराष्ट्र सरकार
2009 - पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहचले.
2009 - उद्योग समितीचे सदस्य
2014 - दुसऱ्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहचले.
2014-2018 -
सदस्य, सल्लागार समिती, खाद्य प्रंस्कारण उद्योग मंत्रालय
सदस्य, अर्थ संबधित स्थायी समिती
12 डिसेंबर 2014-
8 जानेवारी 2018 - सदस्य, इतर मागसवर्ग कल्यण समिती
2019 - तिसऱ्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहचले.
2019-2024 - हाऊस समितीचे सदस्य
2019 ते 2022 -
सभापती ग्रामीण विकास आणि पंचायती राज स्थायी समिती
2019-2024 - सदस्य संसदीय राजभाषा समिती