KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये मतदारांशी गद्दारी! मनसेच्या 5 नगरसेवकांचा 65 हजार तर ठाकरेंना सोडणाऱ्या 4 नगरसेवकांकडून 45 हजार मतदारांचा विश्वासघात
KDMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 4 आणि मनसेच्या 5 नगरसेवकांना फक्त 'विकासा'साठी अवघ्या आठच दिवसात सत्ताधाऱ्यांच्या वळचळणीला जावं लागलं. त्यामुळे मतदारांचा विश्वासघात मात्र नक्कीच झाल्याचं दिसतंय.

ठाणे : जगातील सर्वात मोठी लोकशाही असा गाजावाजा होत असलेल्या भारतातील लोकशाही... त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील लोकशाही आता एका वेगळ्याच वळणावर आहे. त्याला कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका. निवडून आल्यानंतर अवघा एक आठवडाही होत नाही, तोपर्यंत या नगरसेवकांनी त्यांना मिळालेल्या मतांशी गद्दारी करून वेगळी भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या चार उमेदवारांनी आणि मनसेच्या पाच उमेदवारांनी विरोधात लढलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालंय. त्यातून त्यांना मिळालेल्या एक लाख मतदारांशी गद्दारी केल्याचं समोर येतंय.
निवडणुकीआधी कल्याण डोंबिवली महापालिका चर्चेत आली ती सर्वाधिक बिनविरोध नगरसेवकांमुळे. या ठिकाणी भाजपचे 14 आणि शिवसेना शिंदे गटाचे 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. त्यानंतर ही महापालिका चर्चेत आली तर भाजप आणि शिवसेनेतील महापौरपदाच्या रस्सीखेचवरून. आता त्या ठिकाणी परत फोडाफोडीची खेळी सुरू झाल्याचं दिसतंय.
शिंदेंच्या शिवसेनेचे बहुमत
कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरेच्या चार नगरसेवकांनी आणि मनसेच्या पाच नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे 53, मनसेचे 5 नगरसेवक असे मिळून 58 होत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 पैकी चार नगरसेवकही शिंदेंना पाठिंबा देतील अशी शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेनं बहुमताच आकडा गाठल्याचं दिसतंय.
मनसेच्या पाच नगरसेवकांना 65 हजार मतदान
कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून मनसेचा पाठिंबा घेण्यात आला. लोकांची कामं करण्यासाठी सत्तेला चिकटून राहिलं पाहिजे असं वक्तव्य मनसेच्या राजू पाटलांनी केलं. पण याच शिंदे गटाच्या विरोधात त्यांच्या पक्षाचे नेते राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच टीका केली होती. शिंदेंची शिवसेना किंवा भाजप नको म्हणून ज्या लोकांनी मनसेला मतदान केलं त्यांच्या मताचं काय?
शिंदे किंवा भाजप नको म्हणून मनसेच्या पाच उमेदवारांना मतदारांनी एक लाखाहून अधिक मतदान दिल्याचं दिसून आलं. पण निवडून येताच ज्यांच्याविरोधात मतदान झालं त्यांच्याच गोटात सामील होऊन या उमदवारांनी त्यांच्याशी प्रतारणा केल्याची चर्चा आहे.
मनसेच्या उमेदवारांना मतं किती?
1) गणेश लांडगे-7685/ 827 मतांनी विजयी
2) शीतल मंढारी-9064/661 मतांनी विजयी
3) प्रल्हाद म्हात्रे -9908/2372 मतांनी विजयी
4) संदेश पाटील - 18546/8946
5) डॉ रसिका संदेश पाटील -15169/5467
दुसरीकडे, ठाकरे गटाचे 11 उमेदवार निवडून आले होते. पण त्यापैकी चार उमेदवार हे ठाकरेंची साथ सोडल्याचं दिसून आलं. त्यापैकी दोन उमेदवारांनी मनसेसोबतच्या गटात सामील होऊन शिंदेंना पाठिंबा दिला.
ठाकरेंच्या या चार उमेदवारांना एकत्रित मिळून जवळपास 45 हजार मतदान झालं आहे. हे मतदान भाजप किंवा शिंदेंच्या विरोधात झालं. पण निवडून येताच या उमेदवारांनी त्यांच्याशी प्रतारणा करत शिंदेंची साथ देण्याचं ठरवलं.
ठाकरेंना सोडणाऱ्या नगरसेवकांची मतं
स्वप्नाली केणे-11830/3717 मतांनी विजयी
मधूर म्हात्रे -10743 /1711 मतांनी विजयी
किर्ती ढोणे-8841/724 मतांनी विजयी
राहुल कोट-14049/3539 मतांनी विजयी
ठाकरेंच्या शिवसेनेच्या चार आणि मनसेच्या पाच नगरसेवकांना फक्त 'विकासा'साठी अवघ्या आठच दिवसात सत्ताधाऱ्यांच्या वळचळणीला जावं लागतंय. त्यांच्या या विकासाच्या दाव्यामुळे, त्यांना मतदान केलेल्यांचा विश्वासघात मात्र नक्कीच झाल्याचं स्पष्ट झालंय.
ही बातमी वाचा:




















